सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा

सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा छडा

Published on

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : भांडवली बाजार आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये एका सहकारी बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरचा समावेश असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा देशभरातील आठ राज्यांतील सायबर गुह्यांमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे.

तळोजा येथील ३७ वर्षीय पर्यावरण सल्लागारासोबत या सायबर टोळीने फेसबुकद्वारे मैत्री करून त्याला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यानंतर या टोळीने एका बनावट ॲपद्वारे सल्लागाराचा विश्वास संपादन करून त्याला विविध बँक खात्यांत पैसे भरण्यास भाग पाडले होते. या टोळीने पर्यावरण सल्लागाराला गुंतवणुकीवर आभासी नफा दाखवून ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान त्याची ५६ लाख २७ हजारांची फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून फसवणुकीची रक्कम वळते झालेल्या बँक खातेधारक सलीम अहमद शेख (वय ४३) याला नालासोपारा येथून अटक केली.

सलीमने चौकशीत त्याचे बँक खाते दोन लाखांच्या मोबदल्यात मोहम्मद नवील हरुन उर्फ मोनु याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी डोंबिवली येथील एका हॉटेलवर छापा टाकून मोहम्मद नवील हरुन याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सायन येथील एका सहकारी बँकेचा रिलेशनशिप मॅनेजर सद्दाम अली एजाज अहमद (वय ३०) हा या टोळीला बँक खाती पुरवत असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी अहमदला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या घरातून १७ चेकबुक, १० डेबिट कार्ड, तीन पासबुक, २६ सिम कार्ड आणि तीन आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

अशी होत होती फसवणूक
मोनु हा मुंबई, ठाणे परिसरातील लॉजमध्ये राहून बँक खात्यांशी संलग्न मोबाईल क्रमांक स्वत:च्या फोनमध्ये लॉगिन करत होता. त्याद्वारे व्यवहारांचे ओटीपी मिळवून तो आपल्या इतर साथीदारांना पुरवत असल्याचे तपासात आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com