

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल चोरीचे सत्र सुरू केले आहेत. अवघ्या दोन दिवसांत प्रथम वर्ग डब्यांतून तीन प्रवाशांचे एकूण दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविले असून तपास सुरू आहे.
पहिली घटना २७ जानेवारीला सायंकाळी घडली. शहाड (पूर्व), कल्याण येथील रहिवासी व ठाणे येथील स्टर्लिंग इन्फोरमेशन रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीत कार्यरत असलेले शुभम सिंह (वय २५) हे कामावरून घरी येत होते. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर आलेल्या धीम्या टिटवाळा लोकलच्या प्रथम वर्ग डब्यात चढले. याचवेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने खिशातील २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. दुसरी घटना २८ जानेवारीला सायंकाळी ६.२२ वाजता घडली. उल्हासनगर येथील रहिवासी दीपेश रंगवाणी (वय २३) हे ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरून अंबरनाथ प्रथम वर्ग डब्यात चढताना त्यांच्या खिशातून ६२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. तिसरी घटना याच दिवशी सायंकाळी ६.२५ वाजता घडली. टिटवाळा येथील रहिवासी जयदीप तोरवणे (वय ३५) हे फलाट क्रमांक पाचवरून आसनगाव जलद लोकलमध्ये चढताना त्यांचा अंदाजे ७९ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला. या तिन्ही घटनांमुळे ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रथम वर्ग डब्यांमध्ये चोऱ्यांचे प्रकार वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणांचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोहमार्ग पोलिस करत आहेत.
आवाहन
प्रवाशांनी लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय असल्याने सतर्क राहावे, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.