कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ऐरणीवर
कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ऐरणीवर
आमदार संजय केळकर महसूलमंत्र्यांना भेटणार
ठाणे, ता. १ (बातमीदार) : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे सुमारे ८० हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात करण्यात आले आहे. मात्र, गावठाण मंजुरी आणि महसुली दर्जाअधावी हे कुटुंब सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्या ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात भेट घेऊन साकडे घातले. याबाबत महसूलमंत्र्यांची लवकर भेट घेऊ, असे संजय केळकर यांनी सांगितले.
तब्बल ६५ वर्षांपूर्वी कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या ८०हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करंजवडे गावात करण्यात आले. या कुटुंबांच्या तीन पिढ्या सोयीसुविधांपासून वंचित असल्याची व्यथा या ग्रामस्थांनी आमदार केळकर यांच्याकडे जनसंवादावेळी मांडली. किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा दिला जातो, परंतु करंजवडे गाव चार एकरवर असून आणखी तीन एकर जमीन गावाला मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. महसुली गावाचा दर्जा आणि गावठाण दर्जा मिळाला नसल्याने शासनाच्या विकास योजना तसेच सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. जिल्हा परिषदेची विकासकामे सुरू असून, अन्य गावांना निधी मिळाला असला तरी करंजवडे गावाला निधी मिळाला नसल्याची बाब ग्रामस्थांनी केळकर यांच्या निदर्शनास आणली. याबाबत केळकर यांनी लवकरच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करून महसुली दर्जा आणि गावठाण मंजुरी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. गावाला महसूल दर्जा आणि गावठाण मंजुरीबाबत केळकर यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असून, त्याला यश मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.
-------------
चौकट
जनसंवादात नागरिकांची विविध निवेदने
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी (ता. ३०) ठाण्यासह इतर तालुक्यांतील नागरिकही समस्यांची निवेदने घेऊन आले होते. यात बाळकुम येथील दोस्ती गृहसंकुल परिसरात वाढत्या अपघातांमुळे गतिरोधकाची मागणी, ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या, मॉडेला चेक नाका येथील कामगार कार्यालय, बेथनी रुग्णालयात रुग्णाचे बिल कमी करणे, शर्मिला सोसायटी, शिधावाटप कार्यालय, सन मोटर्स यांनी केलेली फसवणूक, विकसकाकडून झालेली फसवणूक आदी समस्यांची निवेदने प्राप्त झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

