चौलमधील महिलेच्या हत्येचा उलगडा

चौलमधील महिलेच्या हत्येचा उलगडा

Published on

चौलमधील महिलेच्या हत्येचा उलगडा
४८ तासांत चौघे ताब्यात; रायगड पोलिसांची कारवाई
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः चौल गावातील टेकाळकर आळी येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या खून आणि जबरी चोरीच्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उलगडा केला आहे. याप्रकरणी महिलेचा जावयासह चौघांना ताब्यात घेतले आहे.
मंदा म्हात्रे (७०) या चौल येथे एकट्याच राहत होत्या. बुधवारी (ता. २८) सकाळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून त्यांचा खून केला आणि अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले.
याप्रकरणी महादेव उर्फ शिवा ढोबळे (२५, रा. अहिल्यानगर) यास बीड येथून ताब्यात घेतले. अशोक भोसले (१९) आणि गणेश पंडागळे (२५) यांना जाटदेवळा येथून अटक केली, तर शुभम पवार (२३, रा. अहिल्यानगर) यास पेण येथून ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात मुख्य आरोपी महादेव ढोबळे हा मंदा म्हात्रे यांचा जावई असल्याचे समोर आले आहे. मंदा म्हात्रे घरात एकट्या राहत असल्याची माहिती आरोपींना असल्याने त्यांनी घरात प्रवेश करून खून व चोरी केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भैरु जाधव करीत असून, खून करण्यामागील नेमके कारण आणि चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याबाबत तपास सुरू आहे. अवघ्या ४८ तासांत गंभीर गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल रायगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com