क्यु-नेटच्या जाळ्यात सुशिक्षित महिला अडकली

क्यु-नेटच्या जाळ्यात सुशिक्षित महिला अडकली

Published on

पनवेल, ता. १ (वार्ताहर) : जादा नफ्यासह घरबसल्या लाखो रुपये कमविण्याचे आश्वासन देत क्यु-नेट यासारख्या वादग्रस्त योजनेद्वारे एका सुशिक्षित विवाहित महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या विवाहितेच्या महाविद्यालयीन मित्रानेच ही फसवणूक केली आहे. अभिषेक संजय झगडे (वय ३१) असे संशयिताचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

३० वर्षीय तक्रारदार विवाहिता खांदा कॉलनी येथे राहण्यास असून, ती तळोजा एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत आहे. जून २०२४ मध्ये या विवाहितेचा मित्र अभिषेक झगडे याने तिची भेट घेतली होती. त्या वेळी त्याने क्यु-नेट ग्लोबल कंपनीत पार्टनरशिपमध्ये काम करत असल्याचे व त्याला गत महिन्यात ७० हजार रुपये मिळाल्याचे सांगितले. तसेच तिला लहान मुलाला सांभाळून घरबसल्या १० ते २० हजार रुपये कमवता येऊ शकतात, असे सांगितले. तसेच त्याने या व्यवसायात ५० लाख ते एक कोटींपर्यंत नफा असल्याचे सांगून विवाहितेचा विश्वास संपादन केला.

अभिषेकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या विवाहितेने नोव्हेंबर २०२४ मध्ये म्युच्युअल फंडातील तीन लाख ७० हजार रुपये काढून ते अभिषेकला दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्याने या विवाहितेचा बनावट ई-मेल आयडी तयार करून त्यावरून तीन लाख ५२ हजारांची निरुपयोगी उत्पादने तिच्या नावावर खरेदी केली. ही उत्पादने या विवाहितेला कधीच मिळाली नाहीत. त्यानंतर ११ डिसेंबरला पनवेलमधील ओरियन मॉल येथे या कंपनीच्या बैठकीसाठी विवाहिता गेली असताना, तिला झोन तयार करण्याच्या नावाखाली नातेवाइकांकडून जबरदस्तीने दोन लाख रुपये मागण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकारामुळे विवाहितेला संशय आल्याने तिने अभिषेककडे पैशांची मागणी केली, मात्र अभिषेकने पैसे देण्यास स्पष्ट नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिने खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com