कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातील ‘बाजीगर’

कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणातील ‘बाजीगर’

Published on

कल्याण-डोंबिवलीत बाजीगर विरुद्ध धुरंधर!
पालिकेच्या सत्तेसाठी शिंदे-मनसेचा तह
डोंबिवली, ता. २ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, या राजकीय खेळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे दोन मुख्य मोहरे किंगमेकर ठरले आहेत. या विजयानंतर शहरात लागलेल्या फलकांनी राजकीय चर्चेला उधाण आले असून, डॉ. शिंदेंना बाजीगर तर राजू पाटलांना रिअल धुरंधर अशा उपाध्या बहाल करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून कल्याण-डोंबिवली भाजपमय करण्याचा विडा उचललेल्या भाजपला शिवसेनेच्या (शिंदे गट) या चालीने मोठा धक्का बसला आहे. भाजपशी थेट चर्चा करण्याऐवजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या मनसेशी हातमिळवणी केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपचा महापौर करण्यासाठी आग्रही असतानाच दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी नरमाईची भूमिका घेण्याचे आदेश दिल्याने भाजपला सध्या वेट अँड वॉच मोडवर जावे लागले आहे.
शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अत्यंत चतुराईने फिल्डिंग लावली होती. आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटातील चार नगरसेवकांना आपल्याकडे वळविण्यात डॉ. शिंदेंना यश आले. या जोडजोडीमुळे शिवसेनेने भाजपशिवाय सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ मिळवून स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले.

पोस्टर्सनी शहर गाजले
महापालिकेवर भगवा फडकवण्यात निर्णायक भूमिका बजावल्याने मनसे समर्थकांनी राजू पाटील यांच्या सन्मानार्थ ‘रिअल धुरंधर’ असे पोस्टर्स लावले आहेत. तर दुसरीकडे भाजपला बाजूला सारून स्वतःचा महापौर बसवण्यात यशस्वी ठरलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या समर्थकांनी ‘बाजीगर’ म्हणून संबोधले आहे.

कर्जत प्रकरणाची चर्चा
ठाकरे गटाचे उरलेले सात नगरसेवक फोडण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू होते; मात्र कर्जत फॉरेस्ट क्लब प्रकरणातून वेळीच माघार घेतल्याने हे नगरसेवक बचावले, अशी दबक्या आवाजात चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com