

शपथ घेण्यापूर्वीच सूत्रे हाती!
अधिकृत घोषणेपूर्वीच ‘नियोजित’ महापौरांची प्रशासकीय बैठक
ठाणे, ता. २ : ठाणे महापालिकेत महापौर निवडीची केवळ औपचारिकता बाकी असतानाच एक नवा प्रशासकीय चमत्कार पाहायला मिळत आहे. महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर यांची अधिकृत घोषणा मंगळवारी होणार असली, तरी त्यापूर्वीच त्यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनानेही त्यांचा उल्लेख ‘नियोजित महापौर’ असा करीत या बैठकीचे समर्थन केले आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीचे स्पष्ट बहुमत असून, महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी भाजपचे कृष्णा पाटील या दोघांचेच अर्ज आले आहेत. ३ फेब्रुवारीला त्यांची अधिकृत निवड जाहीर होणार आहे. मात्र ही घोषणा होण्यापूर्वीच पिंपळोलकर यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची सर्वंकष स्वच्छता मोहिमेबाबत बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, नगरसेवक भरत चव्हाण हे उपस्थित होते. तसेच सोमवारी (ता. २) सकाळी ७ वाजल्यापासून नौपाडा आणि कोपरी परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता मोहीमही राबवून प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली.
नगरसेवक म्हणून निवडून आले असले तरी जोपर्यंत महापौर पदाची अधिकृत निवड होत नाही, तोपर्यंत प्रशासकीय बैठका घेता येत नाहीत, असा संकेत आहे. मात्र यासंदर्भात पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता ‘त्यांची निवड निश्चित असल्याने ‘नियोजित महापौर’ म्हणून ही बैठक पार पडली,’ असा अजब दावा करण्यात आला आहे.
शिंदेंच्या संकल्पनेवर भर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छ ठाणे संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मात्र लोकशाही प्रक्रियेत अधिकृत निवडीपूर्वीच महापौर म्हणून अधिकार गाजवल्याने राजकीय वर्तुळात या घाईची जोरदार चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.