प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम

प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम

Published on

प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम
उल्हासनगरला आज नवा महापौर-उपमहापौर
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : चार वर्षे प्रशासकांच्या हातात असलेली उल्हासनगर महापालिका अखेर पुन्हा लोकनियुक्त सत्तेकडे परतत आहे. प्रशासकीय राजवटीच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी (ता. ३) महापौर आणि उपमहापौर निवडीच्या माध्यमातून शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळणार आहे. सत्तासमीकरण आधीच ठरलेले असून, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील सामंजस्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक ठरणार आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या सत्ताकेंद्रावर कोण विराजमान होणार, हे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

महापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अश्विनी कमलेश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उपमहापौरपदासाठी भाजपकडून अमर लुंड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. विहित मुदतीत अन्य कोणताही अर्ज न आल्याने दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात सत्तावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे देण्यात आले असून, या निर्णयामुळे महापालिकेतील सत्तासंतुलनावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.

विकासकामांना गती मिळणार?
प्रशासकांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या कारभारामुळे अनेक विकासकामे रखडली होती. आता लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेवर येत असल्याने शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य आणि नागरी सुविधांबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहेत. नव्या नेतृत्वाकडून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार असून, चार वर्षांनंतर शहराचा कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हातात जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com