उलवेत निष्काळजीपणाचे डबके

उलवेत निष्काळजीपणाचे डबके

Published on

उलवेत निष्काळजीचे डबके
दुर्गंधी, खड्डे, अपघात, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
उलवे, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारा उलवे नोड आजही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उलवेतील विविध सेक्टर, अंतर्गत रस्ते व वसाहतींमध्ये ठिकठिकाणी साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, मोठमोठे खड्डे आणि मोडकळीस आलेले रस्ते हे आता केवळ गैरसोयीचे न राहता अपघातांचे केंद्र बनले आहेत. विकासाच्या नावाखाली उभारलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मात्र दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अनेक भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले असून, या खड्ड्यांमध्ये साचलेले घाणेरडे पाणी दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे न दिसल्याने वाहन घसरून पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक नागरिक किरकोळ-मोठ्या अपघातांत जखमी झाले असून, वाहनेही मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत आहेत.
डबक्यांमध्ये साचलेले पाणी दुर्गंधीयुक्त असून, त्यातून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. परिणामी मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार सिडको व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतीच कार्यवाही होत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र, पहिल्याच पावसात रस्ते पुन्हा उखडतात. यावरून कामाचा निकृष्ट दर्जा आणि नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून येतो.
यासंदर्भात प्रशासकीय सिडको अधिकारी वाळिंबे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित परिसराची पाहणी करून साचलेले पाणी व घाण तातडीने साफ करण्यात येईल, तसेच आवश्यक ती उपाययोजना लवकरच राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट
निवडणुकीचा मुद्दा
उलवेतील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि निकृष्ट कामांना आळा घालणे, हा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचा महत्त्वाचा प्रश्न ठरण्याची चिन्हे आहेत. नागरिक उमेदवारांकडून केवळ आश्वासनांऐवजी ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. विकासाच्या झगमगाटामागे दडलेली ही अस्वस्थ वास्तवस्थिती निवडणुकीत प्रशासनाची परीक्षा घेणार, हे मात्र निश्चित आहे.

प्रतिक्रिया
“गाडी चालवताना रोज कसरत करावी लागते. स्लिप होऊन अनेकांना इजा झाली आहे. माझ्याही पायाला जखम होऊन अनेक दिवस चालताना त्रास झाला.”
- कृष्णा खारकर (स्थानिक रहिवासी)

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com