भिवंडी महापालिका २०५४ पर्यंत तहान भागवण्याची तयारी
२०५४ पर्यंत तहान भागवणार
४२६ कोटींचा महाप्रकल्प ः भिवंडी महापालिकेचे रुपडे पालटणार
भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी सर्वात गंभीर समस्या म्हणजे पिण्याचे पाणी. सध्या शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अमृत योजना २.० अंतर्गत भिवंडीसाठी एक महत्त्वाकांक्षी ४२६ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर केला आहे. यामुळे येत्या काळात शहराला अतिरिक्त १०० एमएलडी पाणी पुरविणार असून त्या अंतर्गत दोन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहे. सन २०५४ पर्यंत भिवंडीकरांची तहान भागवण्याचे लक्ष ठेऊन हा प्रकल्प उभा राहत असून त्याचे काम सुरु झाले आहे.
भिवंडी शहरासाठी शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र सरकारने ४२६ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम १७ जानेवारी २०२४ रोजी सुरु करण्यात आले होते आणि ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यकारी अभियंता संदीप पटनवार यांच्या मते, आतापर्यंत सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. भिवंडी तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) जमिनीवर काम सुरू असल्याने, एनओसी आणि जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणींमुळे या प्रकल्पाच्या कामास विलंब झाला आहे. सोनाळे आणि पिसे धरण क्षेत्रात आता जमिनीचे सीमांकन करण्याचे काम सुरू आहे. हे अडथळे दूर झाल्यानंतर कामाला गती येईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक भागात पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, शहराच्या विविध भागात २४ पाण्याच्या टाक्या बांधल्या जातील. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनवार यांनी सांगितले की, या प्रकल्पांतर्गत शहरात मोठ्या आणि लहान अशा २४ पाण्याच्या टाक्या बांधल्या जातील. अशोक नगर, एसटी स्टँड आणि नारपोली येथील ७२ गाला जवळील दोन पाण्याच्या टाक्या आणि नारळी तलाव आणि वरळा मंदिराजवळील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले आहे. या टाक्यांची क्षमता १.२ दशलक्ष लिटर ते २० दशलक्ष लिटरपर्यंत असेल, यामुळे प्रत्येक क्षेत्रासाठी पुरेसा पाण्याचा दाब सुनिश्चित होईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भिवंडीची पाणीटंचाई इतिहासजमा होईल आणि शहराला पुरेसे पाणी मिळेल, असे पाणीपुरवठा विभागाने म्हंटले आहे.
या भागात पाण्याच्या टाक्या बांधल्या जातील
७२ गाला, वसई रोड, साठे नगर, नारली तलाव, समद नगर, मौलाना आझाद गार्डन, एसटी डेपो, नागाव, शांती नगर, नवी बस्ती, नेहरू नगर, सोनाळे, आझाद नगर, गायत्री नगर, अशोक नगर, वरळा मंदिराजवळ. या व्यतिरिक्त, भिवंडीमध्ये पाणी साठवण्यासाठी डोंगराळ भागात चार टाक्या बांधल्या जातील.
पिसे धरणापासून भिवंडीपर्यंत १५ किमी लांबीची पाईपलाईन
या प्रकल्पांतर्गत, मुंबई महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे धरणापासून भिवंडी शहरापर्यंत सुमारे १५ किमी लांबीची १३२१ मिमी व्यासाची मुख्य पाईपलाईन टाकली जाईल. या व्यतिरिक्त शहरात २०० मिमी ते ६०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनसह ३९ किलोमीटरचे वितरण नेटवर्क तयार केले जाईल. अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रकल्पाचा तांत्रिक दृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेल्या मुख्य महामार्गाखाली पाईपलाईन टाकली जाणार आहे. तसेच पूल, पंप हाऊस आणि सबस्टेशन देखील बांधले जातील. हा प्रकल्प केवळ पाईपलाईनपुरता मर्यादित नाही. त्यात जॅकवेल, ओव्हरहेड पंप हाऊस, वीज पुरवठ्यासाठी सबस्टेशन आणि भातसा नदीवर ६०० मीटर लांब आणि ६.५ मीटर रुंद पूल बांधणे या कामांना समाविष्ट केले आहे. आमणे नाल्यावर १३० मीटर लांब आणि ३.६५ मीटर रुंद पूल बांधला जाईल. या पुलावरून पाईपलाईन सुरक्षितपणे भिवंडीला आणता येणार आहे.
दूषित व अशुद्ध पाण्यापासून सुटका
सध्या भिवंडीतील मोठ्या लोकसंख्येला अजूनही दूषित व अशुद्ध पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत दोन जलशुद्धीकरण संयंत्रे बांधली जातील. सोनाळे येथे १२३ एमएलडीचा एक संयंत्र आणि टेमघर येथे ५३ एमएलडीचा एक संयंत्र अशीही दोन कार्यान्वित झाले की, भिवंडीतील रहिवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल.
शहराचा पाणीपुरवठा तीन झोनमध्ये विभागला जाणार
संपूर्ण शहर तीन पाणीपुरवठा झोनमध्ये विभागले जाईल. स्टेममधून ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकाकडून ४२ एमएलडी, आणि भातसामधून १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जाईल. यामुळे पाणी वितरणाचे चांगले नियंत्रण करता येईल.
केंद्र, राज्य आणि महानगरपालिका सामायिक भागीदारी
या प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका तीन पातळ्यांवर करीत आहेत. यासाठी १४२ कोटी केंद्र सरकार, १५६ कोटी राज्य सरकार आणि १२८ कोटी भिवंडी महानगरपालिका देणार आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार २०५४ हे वर्ष लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे.
वर्ष लोकसंख्या मागणी
२०२४ ९,८४,४७४ १७४ एमएलडी
२०३९ १२.८४ लाख २२२ एमएलडी
२०५४ १५.८४ लाख २७३ एमएलडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

