फुगे उद्योगाला घरघर
फुगे उद्योगाला घरघर
डहाणूतील अनेक कारखाने बंद, स्थानिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
महेंद्र पवार ः सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ३ ः पर्यावरण नियमांचे वाढते बंधन, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ, परदेशातून स्वस्त फुग्यांची आयातीने डहाणू परिसरातील पारंपरिक फुगे उद्योग संकटात सापडला आहे. अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने स्थानिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
डहाणूत १९६२ पासून सुमारे दीडशे कारखाने कार्यरत होते. पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांना देशभरातून मोठी मागणी होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या राज्यांत डहाणूचे फुगे पाठवले जात. या उद्योगातून सुमारे २५ हजार आदिवासी, मच्छीमार समाजातील लोकांना थेट तसेच अप्रत्यक्ष रोजगार मिळत होता. अनेक महिलांना घरगुती पातळीवर फुगे पॅकिंग, नक्षीकाम करत होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे. केरळमधून येणारा रबराच्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. तर दुसरीकडे चीन, मलेशिया, श्रीलंका देशांतून स्वस्त फुगे बेकायदेशीर मार्गाने भारतीय बाजारात येत असल्याने स्थानिक उत्पादनाला स्पर्धा करणे कठीण झाले आहे.
----------------------------
भवितव्य संकटात
- पर्यावरण प्राधिकरणाच्या कडक नियमांमुळे लहान कारखानदारांना आवश्यक यंत्रणा उभारणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. उद्योग पर्यावरणास फारसा घातक नसतानाही उद्योगाला ‘लाल’ वर्गातून ‘हिरवा’ किंवा ‘गुलाबी’ वर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी होत आहे.
- स्थानिक नागरिक, कामगार, उद्योजकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून पर्यावरण नियमांबाबत सुसंगत तोडगा काढावा, आर्थिक सवलतींची गरज आहे. त्यामुळे उद्योगाचे भवितव्य आता शासनाच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
--------------------------
कुटुंबांची उपासमार
आशागड, गंजाड, सावटा, सरावली, सोगवे, मणिपूर, रायतळी, आशवेतील शेकडो कुटुंबे फुगे उद्योगावर अवलंबून होती. सध्या डहाणू परिसरात अवघे पाच ते आठ कारखाने सुरू असून उर्वरित बंद किंवा गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे कुशल-अकुशल कामगार, महिला कामगार, घरगुती काम करणाऱ्या कुटुंबांचे उत्पन्न ठप्प आहे. त्यामुळे कधीकाळी ‘फुगे कारखान्यांची नगरी’ अशी ओळख लुप्त होण्याची भीती आहे.
ृृृृृृृ------------------------------------
डहाणू तालुक्यात अनेक वर्षांपासून फुगे कारखाने सुरू होते. आमच्यासारख्या हजारो स्थानिकांना रोजगार मिळत होता. पण पर्यावरणविषयक नियम, शासनाच्या अनास्थेमुळे कारखाने बंद पडले किंवा गुजरातला गेले. आता काम मिळणे कठीण झाले आहे.
- सुरेश रावते, कामगार
---------------------------------
फुगा व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे. शासनाने काही नियम शिथिल करून हा उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतो. चीन, थायलंड सारख्या देशांमधून मोठ्या प्रमाणात फुगे आयात केले जातात.
- विपुल शहा, फुगा व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

