मोफत ॲम्ब्युलन्स सेवा लवकरच सुरू होणार

मोफत ॲम्ब्युलन्स सेवा लवकरच सुरू होणार

Published on

‘जनतहित फाउंडेशन’तर्फे मोफत रुग्णवाहिका सेवा
टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) : आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. ही गंभीर समस्या ओळखून ‘जनतहित फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेने टिटवाळा आणि कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांसाठी २४ तास पूर्णतः मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेकदा खासगी रुग्णवाहिकांचे अवाढव्य भाडे परवडत नाही किंवा रात्री-अपरात्री वाहन उपलब्ध होत नाही. यामुळे उपचारास होणारा विलंब टाळण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येत आहे. ही रुग्णवाहिका केवळ रुग्णांसाठीच नव्हे, तर गर्भवती महिला आणि अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’ ठरेल. विशेष म्हणजे, या सेवेसाठी नागरिकांकडून एकही रुपया शुल्क घेतले जाणार नाही. रुग्णवाहिका ही केवळ एक गाडी नसून ती संकटात असलेल्या व्यक्तीसाठी जीवनाची शेवटची आशा असते. वेळेवर मदत मिळाली, तर अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात. म्हणूनच ही सेवा अखंड आणि विश्वासार्ह ठेवण्याचा आमचा मानस आहे. अशी प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष रितेश कांबळे यांनी दिली.

मानवतेची सेवा
जनतहित फाउंडेशन केवळ आरोग्य क्षेत्रातच नव्हे, तर निसर्ग संवर्धनातही अग्रेसर आहे. जखमी व आजारी पक्ष्यांचे प्राण वाचवणे, पर्यावरण रक्षण करणे अशा विविध उपक्रमांतून संस्था सामाजिक बांधिलकी जपत आहे. टिटवाळा आणि परिसरातील गरजू नागरिकांसाठी ही मोफत रुग्णवाहिका सेवा लवकरच कार्यान्वित होणार असून, यामुळे सर्वसामान्यांना मोठा आधार मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com