अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेची कोकण प्रांत बैठक संपन्न

अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेची कोकण प्रांत बैठक संपन्न

Published on

माजी सैनिकांची कोकण प्रांत बैठक

पोयनाड, ता. ३ (बातमीदार) : अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेच्या कोकण प्रांताची सर्वसाधारण बैठक नुकतीच परहूर येथे पार पडली. या बैठकीला पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यांतील पूर्व सैनिक परिषदेचे पदाधिकारी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय परहूर येथील सभागृहात झालेल्या या बैठकीत भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमांचे पूजन करून ‘हम भारत के पूर्व सैनिक...’ या संघटन गीताने बैठकीची सुरुवात करण्यात आली.
सभेमध्ये विविध जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यांचे कार्यवृत्त सादर केले. राज्य संघटकांनी सिंधुदुर्ग तसेच विशेषतः रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत कार्याचे सादरीकरण केले. रायगड जिल्ह्यात नायक संतोष तावडे हे विविध संस्था व शाळांमधून विद्यार्थ्यांना व युवकांना भारतीय सेनादलाने राबविलेल्या विविध ऑपरेशन्सबाबत माहिती देणे, देशाच्या भावी पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करणे, राष्ट्र प्रथम ही भावना रुजवणे तसेच भारतीय सेनादलात अग्निवीर व अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करीत असल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच सागरी सीमा मंच या संस्थेसोबत सागरी सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती केल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रांत बैठकीला अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, महाराष्ट्र व गोवा संघटन मंत्री रमेश देसाई, उपाध्यक्ष ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव व कोकण प्रांत अध्यक्ष मेजर विनय देगावकर, प्रमुख वक्ते रविकिरण काळे यांनी मार्गदर्शन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com