ठाणे पोलिसांकडून कांदळवन भराव

ठाणे पोलिसांकडून कांदळवन भराव

Published on

कांदळवनातील भरावावरून वाद
पोलिस आयुक्तांविरोधात पर्यावरणप्रेमींची तक्रार; न्यायालयात जाण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ ः कायद्याची अंमलबजावणी करणारी पोलिस यंत्रणाच जर नियम मोडत असेल, तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा प्रश्न सध्या ठाण्यात उपस्थित झाला आहे. याला कारण ठरले ते कांदळवन भरावाचे. साकेत परिसरातील कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रात ‘मियावाकी गार्डन’च्या नावाने ठाणे पोलिसांकडूनच बेकायदा भराव टाकला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी तक्रारी, पाहण्या, अहवाल आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होऊनही आजवर गुन्हा नोंदवलेला नाही. ठाणे महापालिकेने राबोडी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची रीतसर तक्रार नोंदवूनही कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी आता मैदानात उतरले आहेत. त्यांनी पोलिस आयुक्ताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १० दिवसांत कायदेशीर कारवाई न झाल्यास ठाणे पोलिस आयुक्तांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर कांदळवन भरावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रीतसर परवानगी घेतल्याचा दावा ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केला आहे. परवानगीची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच होणारे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले.

रुस्तमजी गृहप्रकल्पाजवळून साकेत पोलिस ग्राउंडच्या बाजूने वाहणारा नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीत मिळतो. या नाल्यालगतचा सर्व्हे क्रमांक ३८६ (४ भाग) सुमारे १० हेक्टर क्षेत्राचा असून तो सीआरझेड या पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील श्रेणीत मोडतो. धक्कादायक बाब म्हणजे, या जमिनीच्या सात/बारा उताऱ्यावर भोगवटादार म्हणून ‘पोलिस आयुक्त, ठाणे’ अशी नोंद आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील कांदळवनावर मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात आहे. १७ नोव्हेंबर २०२५ला आकाशगंगा संकुलातील रहिवाशांना खारफुटीवर भराव टाकला जात असल्याचे दिसले. त्यांनी याप्रकरणी तहसीलदार तसेच राबोडी पोलिस ठाणे तसेच कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांच्याकडे तातडीने तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबरला वन विभागाच्या कांदळवन कक्षाने स्थळपाहणी केली; मात्र त्यानंतरही भराव सुरूच राहिला.

२५ नोव्हेंबरला उच्चस्तरीय पाणथळ तक्रार निवारण समितीकडे प्रकरण गेले. कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने झालेल्या पाहणीत अनेक ॲव्हिसोनिआ मरीना जातीचे अनेक तिवरे अर्धवट तुटलेले, काही मातीखाली गाडलेले आढळले. वन विभागाने गंभीर निरीक्षणांसह सविस्तर अहवाल तयार केला. त्यानंतर दोन आठवडे उलटूनही भराव टाकण्याचे थांबत नसल्याचे आढळून आले. याबाबत कांदळवन कक्षाकडे कारवाईबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. ठाणे पोलिस आयुक्तालयाने १८ डिसेंबर २०२५ला या जागेवर मियावाकी पद्धतीने १८ हजार रोपे लावण्याची परवानगी मागितल्याचे सांगण्यात आले; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ डिसेंबरला दिलेल्या उत्तरात अशी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ठाणे महापालिकेला प्राप्त तक्रारीची शहानिशा करून नियमानुसार कारवाईचे आदेश दिले.

कारवाईबाबत टाळाटाळ
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने ७ जानेवारी २०२६ला पाहणी करून भराव पोलिस विभागाकडूनच होत असल्याचे स्पष्ट केले होते. ९ जानेवारीला राबोडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार देऊनही महिनाभर गुन्हा दाखल केलेला नाही. अखेर पर्यावरण कार्यकर्ते रोहित जोशी यांनी २८ जानेवारीला पोलिस आयुक्तालयाला कायदेशीर नोटीस बजावली असून, १० दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

पुराची भीती
साकेत परिसरातील ही पाणथळ जागा नैसर्गिक पाण्याचा निचरा करण्यासाठी महत्त्वाची आहे. येथे झालेल्या बेकायदा भरावामुळे येत्या पावसाळ्यात रुस्तमजी, आकाशगंगा आणि साकेत यांसारख्या सखल भागात पुराचे पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. निसर्गाचा हा नाश केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर हजारो नागरिकांच्या जीवितासाठीही धोकादायक ठरणार आहे.

पोलिसांची भूमिका संशयास्पद
खाकी वर्दीला ‘मियावाकी’चा मोह का? कांदळवनाचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असताना, १८ हजार वृक्ष लावून ‘मियावाकी उद्यान’ उभारण्याची जबाबदारी पोलिसांनी स्वतःहून का घेतली, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, खारभूमीत नैसर्गिक तिवरांशिवाय इतर वृक्ष जगणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असतानाही, तज्ज्ञांचा सल्ला न घेता कांदळवनाचा बळी का दिला जात आहे, असा रोखठोक प्रश्न पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
कांदळवन संवर्धनाची जबाबदारी असणारी पोलिस यंत्रणाच जेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहते, तेव्हा कारवाई कुणी करायची? महसूल विभाग, महापालिका आणि वन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असताना कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच नियम पायदळी तुडवत असल्याची चर्चा सध्या ठाण्यात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com