मालमत्ता कर वसुलीचा धडाका
वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असणाऱ्या मालमत्ता करवसुलीसाठी मालमत्ता कर विभागाने कंबर कसली आहे. आता पालिकेने थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कठोर कारवाई सुरूदेखील केली आहे. आतापर्यंत ३८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. पालिकेने आतापर्यंत ६२६ कोटींची वसुली केली आहे. पालिकेने एक हजार कोटींचे करवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. यंदा पालिका ही झेप घेण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालिकेने २०२४-२५मध्ये मालमत्ता करांतून ८२६ कोटींची वसुली केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालिका हा आकडा नक्कीच पार करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पालिका मार्चअखेर मालमत्ता करांसाठी अभय योजना काढते. यंदादेखील ही योजना निघणार का, याकडे थकीत मालमत्ताधारकांचे लक्ष आहे. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपायुक्त डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागातील जप्ती पथकाकडून ही मालमत्ता जप्ती कारवाई करण्यात आली आहे.
नोटिसा बजावण्यास प्राधान्य
औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेने मागील वर्षी अभय योजना राबवली आहे. मोठ्या सोसायट्या, इमारतींमधील रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिकेने वारंवार कळवूनही मालमत्ता कर भरलेला नाही. त्यानुसार मालमत्ता करवसुलीवर पालिकेकडून भर दिला जात आहे. तर पालिकेकडून जप्तीच्या नोटिसादेखील काढण्यात येत आहेत.
थकबाकीदारांना सूट नाही
वारंवार आवाहन करूनही जे मालमत्ताधारक कर भरीत नाहीत अशा थकबाकीदारांना कोणतीही सूट न देता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असून, त्यादृष्टीने पालिकेने नियोजन केले आहे. यासाठी पालिकेकडून जप्ती पथक स्थापन करण्यात आले आहे. शहरातील सर्व विभागीय कार्यालयांमार्फत ही मोहीम राबविण्यात येत असून, थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नोंदणीकृत मालमत्ता ३,०९,२९६
निवासी मालमत्ता २,६३,०९७
अनिवासी मालमत्ता ६०,०८५
औद्योगिक क्षेत्र ६,११४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

