म्हाडा आणि महापालिकेच्या वादामुळे रहिवाशांना भुर्दंड

म्हाडा आणि महापालिकेच्या वादामुळे रहिवाशांना भुर्दंड

Published on

म्हाडा-पालिकेच्या वादात रहिवाशांची कोंडी
आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीने दिलासा
ठाणे, ता. ४ : म्हाडा आणि ठाणे महापालिका यांच्यातील प्रशासकीय वादामुळे म्हाडा रहिवाशांवर ओढवलेले लाखो रुपयांच्या मालमत्ता कराचे संकट अखेर टळले आहे. आमदार संजय केळकर यांनी या विषयात यशस्वी मध्यस्थी केल्याने रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खोपट येथील ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.

म्हाडाच्या वसाहतींमधील मालमत्ता कराचा काही तांत्रिक हिस्सा म्हाडाने भरणे बंधनकारक आहे; मात्र म्हाडा आणि महापालिका यांच्यातील अंतर्गत आर्थिक व्यवहारांमुळे हा प्रश्न प्रलंबित होता. याचा फटका बसून रहिवाशांना थेट लाखो रुपयांची देयके धाडण्यात आली होती.

वास्तविक हे पैसे म्हाडाने भरणे आवश्यक आहे. महापालिकेने रहिवाशांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, यापुढे रहिवाशांना अशी चुकीची देयके पाठवली जाणार नाहीत, असे आश्वासन आमदार केळकर यांनी दिले आहे. तसेच महापालिकेच्या अभियंता विभागातील कंत्राटी कामगारांच्या शोषणाबाबतही केळकर यांनी संताप व्यक्त केला. १०-१० तास काम करूनही कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

कंत्राटदारांवर कारवाईची मागणी
कंत्राटदारांनी महापालिकेत ‘राज’ सुरू केले असून ते नियमांचे उल्लंघन करीत आहेत. या प्रश्नावर लवकरच महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक बोलावून कंत्राटदारांना हटवण्याबाबत आग्रही राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या फेरतपासणीचा प्रश्न मार्गी
याच कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांनीही गाऱ्हाणी मांडली. वर्षभर उलटूनही उत्तरपत्रिकांची फेरतपासणी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. केळकर यांनी तातडीने विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असून, अधिकाऱ्यांनी फेरतपासणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे मान्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com