इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

Published on

वाशी, ता. ४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या महापौर अणि उपमहापौर या पदांची उद्या गुरुवारी (ता. ५) औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यामुळे आता अनेक इच्छुकांचे लक्ष स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि स्वीकृत नगरसेवक या पदांकडे लागले आहे. या पदांसाठी इच्छुकांनी मोर्चेचांधणीला सुरुवात केली आहे.

२०१५ नंतर थेट २०२६मध्ये महापालिकेची निवडणूक पार पडली. सहा वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या या निवडणुकीमुळे नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेक नगरसेवक उत्सुक आहेत. महापौर, उपमहापौर या पदांसाठी अनेक नावे चर्चेत होती; मात्र भाजपकडून बंद लिफाफ्यातून आलेले नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे चर्चेत नसलेल्या चेहऱ्याला महापौर होण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार सुजाता पाटील यांनी महापौरपदासाठी, तर दशरथ भगत यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. गुरुवारी या पदांची निवड जाहीर होणार असून, शहराला नवे नेतृत्व मिळणार आहे. महापौर, उपमहापौर होण्याची संधी हुकल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक इच्छुकांनी महापालिकेतील इतर महत्त्वाच्या पदांकडे मोर्चा वळवला आहे.

स्थायी समिती सभापती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत नगरसेवक या पदांसाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेणे, आपल्या नावाचा विचार व्हावा, यासाठी पाठपुरावा करणे सुरू झाले आहे. महापौर, उपमहापौर या पदांच्या शर्यतीतील इच्छुकांकडून आता या पदांसाठी आग्रह धरला जात आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेच्या नगरसेवकाकडे जाण्याची शक्यता असून, त्यासाठीही अनेक नावे चर्चेत आहेत.

भाजपकडे महत्त्वाची पदे?
महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता ही महत्त्वाची पदे भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांनी पक्षनेतृत्वाकडे आपली मागणी मांडण्यास सुरुवात केली आहे.

इच्छुकांना संधीची शक्यता
निवडणुकीपूर्वी तयारी करूनही काही इच्छुकांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली होती. काहींनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अशा इच्छुकांना पुढील टप्प्यात पदवाटप करताना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन पक्षांकडून देण्यात आले होते. त्यामुळे या पदांसाठी त्यांच्या नावांचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्पर्धा
या निवडणुकीत अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही किंवा माघार घ्यावी लागली. काहींना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यात काही प्रस्थापित नगरसेवकांचाही समावेश आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रवेश मिळू शकतो, या आशेवर अनेक इच्छुक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी संबंधित पक्षनेतृत्वाकडे पाठपुरावा सुरू आहे. अद्याप कोणत्याही पक्षाने स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर केलेली नाही; मात्र आपले नाव या यादीत यावे, यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com