उल्हासनगरात ‘वडापाव–दाल पकवान’ची सत्ता
उल्हासनगरात ‘वडापावृ-दाल पकवान’ची सत्ता
एकनाथ शिंदेंची उपमा ठरली खरी
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : निवडणूक प्रचारात उच्चारलेले शब्द केवळ भाषणापुरते न राहता थेट सत्तेचे रूप धारण करतात, याचे जिवंत उदाहरण उल्हासनगरच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान गोल मैदानावर केलेली ‘वडापाव आणि दाल पकवान’च्या युतीची घोषणा अखेर प्रत्यक्षात उतरली असून, उल्हासनगरच्या सत्ताकेंद्रात एका नव्या सामाजिक-राजकीय पर्वाची सुरुवात झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या वातावरणात एकनाथ शिंदे यांनी ‘वडापाव’ म्हणजे मराठी अस्मिता आणि ‘दाल पकवान’ म्हणजे सिंधी समाजाची ओळख, असे प्रतिकात्मक भाष्य करत दोन संस्कृतींच्या एकत्र येण्याचा स्पष्ट संकेत दिला होता. त्या वेळी ही उपमा केवळ भाषणातील राजकीय शैली मानली जात होती; मात्र आज तीच उपमा प्रत्यक्ष सत्तेच्या समीकरणात साकार झाल्याने राजकीय वर्तुळात या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांच्या सत्तास्थापनेमुळे हे ‘वडापाव-दाल पकवान’चे गठबंधन प्रत्यक्ष प्रशासनात उतरले आहे. महापौरपदी मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अश्विनी कमलेश निकम, तर उपमहापौरपदी सिंधी समाजाचे प्रतिनिधी अमर लुंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीने उल्हासनगरच्या राजकारणात सामाजिक समन्वयाचे नवे चित्र उभे राहिले आहे. या सत्तासमीकरणाकडे केवळ राजकीय गणित म्हणून न पाहता, शहरातील विविध समाजघटकांना एकत्र आणणारे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. मराठी आणि सिंधी समाजातील राजकीय अंतर कमी करून, एकत्रित विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश या युतीतून दिला जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
खासदार डॉ. शिंदेंसाठी खास मेजवानी
महापौर व उपमहापौर निवडीनंतर उल्हासनगरात सत्तास्थापनेचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शहरात शुभेच्छा देण्यासाठी आले असता, त्यांच्या स्वागतासाठी खास ‘वडापाव आणि दाल पकवान’ची मेजवानी ठेवली होती. निवडणूक प्रचारात मांडलेली ‘वडापाव-दाल पकवान’ची उपमा केवळ राजकीय वक्तव्य न राहता, प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित झाल्याची चर्चा या वेळी उपस्थितांमध्ये रंगली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

