मुरबाडमध्ये सर्वांगीण विकासाचे प्रेरणादायी उदाहरण;

मुरबाडमध्ये सर्वांगीण विकासाचे प्रेरणादायी उदाहरण;

Published on

हायटेक आदिवासी वस्ती ठरतेय विकासाचा नवा मापदंड
लांबाचीवाडी सर्वांगीण विकासाचे प्रेरणादायी उदाहरण
मुरबाड, ता. ५ (वार्ताहर) ः मुरबाड नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनमधील लांबाचीवाडी ही आता केवळ आदिवासी वस्ती राहिलेली नाही, तर नियोजनबद्ध व लोकाभिमुख विकासाचा आदर्श नमुना म्हणून उदयास आली आहे. या वाडीतील सर्वांगीण कायापालट पाहून श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचा मूलभूत विकास संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.
शिरवली येथील कार्यक्रमानंतर विवेक पंडित यांनी रविवारी (ता. १) यांनी मुरबाड दौरा केला. या वेळी त्यांनी लांबाचीवाडीला सदिच्छा भेट दिली. वाडीतील सुसज्ज पायाभूत सुविधा, स्वच्छता, नियोजनबद्ध रचना आणि स्वावलंबनावर आधारित उपक्रम पाहून पंडित विशेष प्रभावित झाले. मुरबाड नगर पंचायतीच्या माजी उपनगराध्यक्षा मानसी देसले आणि सामाजिक बांधिलकी जपणारे जनसेवक मनोज देसले यांच्या पुढाकारातून अल्प कालावधीत राबविण्यात आलेल्या विकासकामांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी बोलताना विवेक पंडित म्हणाले, मोठे प्रकल्प म्हणजेच विकास नव्हे, तर सामान्य माणसाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा विकास हाच खरा विकास आहे. येथे मी मार्गदर्शन करण्यासाठी नाही, तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी मानसी व मनोज देसले यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. लांबाचीवाडीतील विकासकामांसाठी आमदार किसन कथोरे यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विवेक पंडित यांनी त्यांचे आभार मानले. आमदार कथोरे यांच्या अनुभवाचा व कार्यशैलीचा लाभ राज्याला व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी तहसीलदार अभिजित देशमुख, मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब एडके, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, माजी नगराध्यक्ष मोहन सासे, नितीन सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव-भगिनी उपस्थित होते.

दैनंदिन जीवन सुलभ
वाडीतील काँक्रीट रस्ते, समाजमंदिर, व्यायामशाळा, हनुमंतरायाचे मंदिर, अंगणवाडी व शाळा, सुसज्ज स्मशानभूमी आणि नियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ झाले आहे. याशिवाय आदिवासी महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शेतीतून विविध भाजीपाला उत्पादनास चालना देणे, संपूर्ण वाडीतील आकर्षक रंगसजावट यामुळे परिसराला नवे व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे. या सर्व उपक्रमांमुळे लांबाचीवाडी ‘हायटेक आदिवासी वस्ती’ म्हणून ओळख निर्माण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com