मोबदला न देता मुंबई पालिकेचा तानसा धरणातून पाईपलाईन चा घाट

मोबदला न देता मुंबई पालिकेचा तानसा धरणातून पाईपलाईन चा घाट

Published on

मोबदल्याविनाच ‘तानसा’ पाइपलाइनचा घाट
मुंबई पालिकेविरोधात दीडशे शेतकरी न्यायालयाचे दार ठोठावणार
वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील तानसा धरणातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. मात्र, अघई ते ताडाली या ४५ किलोमीटर अंतरातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा कोणताही मोबदला न देताच हे काम सुरू केल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. या अन्यायाविरोधात आता शेतकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत असून, श्रमिक शक्ती संघटनेने या लढ्याला पाठिंबा दिला आहे. याबाबत श्रमिक शक्ती संघटनेचे अध्यक्ष देविदास पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले आहे.
मुंबई पालिकेने नवीन तानसा पाइपलाइनसाठी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सुमारे २० ते २२ एकर क्षेत्रातील तब्बल १५० शेतकरी या प्रकल्पामुळे बाधित झाले आहेत, असे देविदास पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. बाधित शेतकऱ्यांसोबत न्यायालयात जाऊन दाद मागू, असा इशारा श्रमिक शक्ती संघटनेचे अध्यक्ष देविदास पाटील यांनी दिला आहे. देविदास पाटील यांनी प्रशासनाने या कामाला तत्काळ स्थगिती न दिल्यास, आम्ही बाधित शेतकऱ्यांसह न्यायालयात जाऊन दाद मागू. शेतकऱ्यांच्या हक्काचा मोबदला मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असे सांगितले आहे.

२०११ पासून न्यायासाठी संघर्ष
श्रमिक शक्ती संघटनेने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी २०११ पासून संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार आणि उपोषण करूनही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. त्या वेळी बाधित शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून पालिका प्रशासनात नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अधिकृत जमीन क्षेत्राला बाजारभावाप्रमाणे मोबदला देऊन शेतकरी कुटुंबीयांना न्याय द्यावा अशा प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com