‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये मानांकन उंचवण्याचा प्रयत्न
वाशी, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सामोरी जात आहे. नियमित क्रमवारीपेक्षा उच्च दर्जाच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष प्रकारात नवी मुंबईचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने व प्रभावीपणे योगदान द्यावे, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व साफसफाई कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या टूलकिटमधील सर्व बाबींची माहिती देत, प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर स्वच्छताकर्मींमार्फत काम होत असल्याने कंत्राटदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात प्रत्यक्ष दिसणाऱ्या स्वच्छतेसह नागरिकांच्या प्रतिसादालाही मोठे महत्त्व देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित सर्व बाबी अधिक गांभीर्याने व परिणामकारकपणे राबवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. गावठाणांतील अंतर्गत भाग, तसेच झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे सांगत, त्या भागातील नागरिकांना कचरा वर्गीकरण व योग्य विल्हेवाटीबाबत सातत्याने प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे उपस्थित होते.
सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक
स्वच्छताकर्मींना सुरक्षा साधने देण्यात आलेली असतानाही अनेकदा त्यांचा वापर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ही साधने वापरणे अत्यावश्यक असल्याचे त्यांना पटवून देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
स्वच्छताकर्मींकरिता सुरू करण्यात आलेल्या कामगार वैद्यकीय सहाय्यता कक्षाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, आवश्यकतेनुसार त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कंत्राटदारांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे आयुष्मान भारत कार्ड तयार झालेले नाही, त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यासोबतच सरकारी विमा योजनांचे लाभ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचेही सांगण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता मानांकनात सर्वात महत्त्वाचे योगदान हे दररोज शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छताकर्मींचे आहे. त्यांच्याकडून कार्य करून घेणाऱ्या सर्व कंत्राटदारांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण’च्या माध्यमातून सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न करावेत.
- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

