

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुहूगावात मद्यपींचा उच्छाद, नागरिकांत भीतीचे वातावरण
नेरूळ, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईतील जुहूगाव परिसरात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वाशी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मद्यपी व अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. जुहूगाव येथील हिम बिंदू सोसायटीसमोरील मोकळ्या मैदानात मद्यपींनी अक्षरशः अड्डा निर्माण केला आहे. हे मैदान गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असून, परिसरातून महिला, शालेय विद्यार्थी व नागरिकांची सतत वर्दळ असते.
नवी मुंबई महानगरपालिकेने येथे विद्युत रोषणाई केली असली, तरी मद्यपींवर त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. भररस्त्यात खुलेआम मद्यपान व नशा करणारे प्रकार सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. महिलांना व नागरिकांना त्रास झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल जुईगाव ग्रामस्थ हिमांशू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वीही या मद्यपींकडून चोरी, महिलांची छेडछाड यांसारख्या घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शांतता व सुरक्षिततेसाठी पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट
पोलिसांची कारवाई फक्त कागदोपत्री?
जुईगाव ग्रामस्थ मंडळाने मद्यपींच्या त्रासाबाबत वाशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांची गस्त कमी असून, कारवाई केवळ नावालाच होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी, हे मैदान मद्यपींच्या अड्ड्यात रूपांतरित झाले आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनाची असेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
कोट
आम्ही वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. मुख्य रस्त्यावरच असा त्रास असेल, तर महिलांनी सुरक्षित कसे राहावे? प्रशासनाने तातडीने ‘मद्यपान करण्यास मनाई’चे फलक लावून गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी.
-हिमांशू पाटील, माजी अध्यक्ष, जुईगाव ग्रामस्थ मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.