रौप्य महोत्सव उत्साहात साजरा
कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात ‘हॅकाथॉन’
संगणकशास्त्र व आयटी विभागाचा रौप्य महोत्सव उत्साहात
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) : प्रसिद्ध बी. के. बिर्ला कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचा रौप्य महोत्सव सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. विभागाच्या १९९९ ते २०२४ या २५ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक आणि तांत्रिक प्रवासाला उजाळा देण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रौप्य महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला २५ तासांचा ‘हॅकाथॉन’ होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याचा वापर करून नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या स्पर्धेसह विविध तांत्रिक उपक्रमांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार उद्घाटन नृत्याने झाली. विभागाच्या ज्येष्ठ उपप्राचार्या प्रा. एस्मिता गुप्ता यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून विभागाच्या आजवरच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. याप्रसंगी विभागाच्या गौरवशाली इतिहासावर आधारित एका माहितीपटाचे प्रक्षेपण करण्यात आले, तसेच विभागाच्या नूतन संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी गेल्या २५ वर्षांतील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि उद्योगांशी असलेल्या संपर्काबाबत विभागाचे कौतुक केले. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगाने होणारे बदल आणि उच्च शिक्षणासमोरील आव्हाने यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विभागाचे पहिले विभागप्रमुख डॉ. जयस्वाल यांनीही आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मान्यवरांची उपस्थिती
सोहळ्याला माजी विभागप्रमुख प्रा. वर्षा पोंक्षे आणि माजी प्राध्यापक प्रा. अतिउत्तमा मिश्रा यांनी उपस्थित राहून विभागासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन प्रा. आकाश कांबळे, प्रा. प्रीतम कांबळे, प्रा. अंजली बंकर व प्रा. प्रीती पारीक यांनी केले. विभागाचे विद्यमान प्रमुख प्रा. विनोद राजपूत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

