शहापूर खरम्याचा पड्यातील झेडपी शाळा अंधारात

शहापूर खरम्याचा पड्यातील झेडपी शाळा अंधारात

Published on

शहापुरातील झेडपी शाळा वर्षभर अंधारात
अविनाश जाधव यांच्याकडून प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेत तब्बल गेल्या एक वर्षापासून वीजपुरवठा नसल्याचे निदर्शनास आले असून, मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांबाबत काही स्थानिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अविनाश जाधव यांनी खरम्याचा पाडा येथील शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. या शाळेत एकूण ३९ विद्यार्थी दोन वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घेत असून, एका वर्गात इयत्ता तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी, तर दुसऱ्या वर्गात उर्वरित इयत्तांचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे भेटीत उघड झाले. फक्त एक हजार ५०० रुपयांचे वीजबिल थकीत राहिल्यामुळे गेल्या एक वर्षापासून शाळेचा वीजपुरवठा खंडित असल्याचा प्रकारही उघडकीस आला. शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट टीव्हीची सुविधा उपलब्ध असतानाही वीज नसल्यामुळे तो वापरात येऊ शकलेला नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर थेट परिणाम होत असून, शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक बेंचची कमतरता, गणवेश व दप्तरांचा अभाव असल्याचेही चित्र समोर आले आहे. याबाबतचे चित्रीकरण मनसे नेते अविनाश जाधव यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला आहे.
................
जिल्हा परिषद शाळांची अशी अवस्था असेल, तर राज्यातील इतर ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती काय असेल, हा गंभीर प्रश्न आहे. शाळाच व्यवस्थित नसतील तर प्रगतीची भाषा करणे फसवे आहे.
- अविनाश जाधव, मनसे नेते
..............................
थकलेले विद्युत बिल तत्काळ भरण्यात येईल. तसेच यापुढे अशी घटना घडणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.
- बाळासाहेब रक्षे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com