महापालिकेच्या नाट्यगृहाचे काम रखडले
महापालिकेच्या नाट्यगृहाचे काम रखडले
ध्वनिक्षेपण, वातानुकूलित व अग्निशमन यंत्रणेसाठी अडीच कोटींचा खर्च
विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘डी’ अंतर्गत निर्माणाधीन असलेल्या मजेठिया नाट्यगृहाच्या कामाचा खर्च पुन्हा एकदा वाढला असून, विद्युत व इतर बांधकाम कामांसाठी तब्बल दोन कोटी ४३ लाख ५५ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या नाट्यगृहावरील एकूण खर्च आता सहा कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी एक कोटी ५७ लाख ५७ हजार ९४५ रुपये विद्युत कामांसाठी, तर ८५ लाख ९७ हजार ७७४ रुपये बांधकामासाठी खर्च करण्यात येणार आहेत. या कामांतून नाट्यगृहातील ध्वनिक्षेपण व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा तसेच अग्निशमन प्रणाली अद्ययावत करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याआधी या कामावर तीन कोटी ६९ लाख ९३ हजार १९९ रुपये खर्च करण्यात आले असून, आता एकूण खर्च सहा कोटींच्या घरात पोहोचला आहे. मागील चार वर्षांपासून मजेठिया नाट्यगृह लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असून, बांधकाम विभागाच्या हलगर्जी व निष्काळजीमुळे हे काम रखडल्याचा आरोप होत आहे. मूळ मंजूर अंदाजपत्रकात ध्वनिक्षेपण, वातानुकूलित व अग्निशमन यंत्रणा उभारणीसाठी आवश्यक तरतूद नसल्याने नाट्यगृहाचे काम पूर्णत्वास जाऊ शकले नसल्याचा खुलासा खुद्द बांधकाम विभागाने केला आहे.
या नाट्यगृहाच्या कामासाठी १७ जून २०२१ रोजी संविदा मंजूर करण्यात आली होती. मात्र, आजतागायत हे काम पूर्ण झालेले नाही. कोविड संक्रमण काळात कामास विलंब झाल्याने महापालिकेविरोधात मानव अधिकार न्यायालयात सुमोटो दावाही दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्याचे तसेच एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, नाट्यगृहाच्या मूळ अंदाजपत्रकात आवश्यक यंत्रणांचा समावेश नसल्याचे लक्षात आल्यानंतर ११ डिसेंबर २०२२ रोजी आयुक्त तथा प्रशासकांनी आंतरिक नक्षीकामासाठी पुन्हा प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली होती. त्या मंजुरीनुसार १८० दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निधीअभावी हे काम अद्याप रखडले असल्याची माहिती महापालिकेतून देण्यात आली आहे.
----------------------
नाट्यगृहाची मूळ किंमत ५७ कोटी ११ लाख ९५ हजार ३३ रुपये इतकी असून, कामाला होत असलेल्या विलंबामुळे वसई-विरार शहरातील रसिक प्रेक्षकांना नाट्य व अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे मजेठिया नाट्यगृहाचे काम तातडीने पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
==========================
चौकट
मजेठिया नाट्यगृह : खर्च व विलंबाचा लेखाजोखा
▪ नव्याने मंजूर निधी : ₹ २ कोटी ४३ लाख ५५ हजार
▪ विद्युत कामासाठी : ₹ १ कोटी ५७ लाख ५७ हजार ९४५
▪ बांधकामासाठी : ₹ ८५ लाख ९७ हजार ७७४
▪ याआधी झालेला खर्च : ₹ ३ कोटी ६९ लाख ९३ हजार १९९
▪ आतापर्यंतचा एकूण खर्च : ६ कोटी रुपयांहून अधिक
----------------------
याबाबतचा कार्यादेश दिला असून, लवकरच हे काम पूर्ण होऊन नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात येईल.
- प्रदीप पाचंगे, शहर अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

