फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने मुख्य रस्ते ठप्प

फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने मुख्य रस्ते ठप्प
Published on

अंबरनाथमध्ये फेरीवाल्यांचा विळखा
सोमवार बाजारामुळे वाहतूक कोंडी; नागरिक हैराण
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) : अंबरनाथ शहरातील मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. पदपथ आणि रस्ते विक्रेत्यांनी व्यापल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यातच दर सोमवारी भरणारा बाजार वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांसाठी ‘डोकेदुखी’ ठरत असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानक ते नगर परिषद कार्यालय हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे; मात्र दर सोमवारी येथे भरणारा बाजार थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पसरलेला असतो. या अनियंत्रित गर्दीमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांनाही रस्ता मिळणे कठीण होते. स्थानिक वाहतूक तासनतास ठप्प राहत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

शहरात फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र ‘हॉकर्स झोन’ नसल्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नियोजित फेरीवाला क्षेत्र तयार झाल्यास मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊ शकतो; मात्र यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

केवळ दिखाऊ कारवाई
अतिक्रमणविरोधी पथकाने वेळोवेळी कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी ही कारवाई केवळ ‘दिखाऊ’ ठरत असल्याची चर्चा आहे. कारवाईनंतर काही वेळातच फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. त्यामुळे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून रस्ते कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करावेत, अशी मागणी अंबरनाथकरांनी लावून धरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com