गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश

गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश

Published on

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत नवी मुंबई पोलिस दलाने २०२५ या वर्षात गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश मिळवला आहे. नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे उकल करण्याच्या प्रमाणात लक्षणीय सुधारणा करीत ८० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे, असा दावा वार्षिक पत्रकार परिषदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिलांची सुरक्षा, नशामुक्त शहर आणि सायबर गुन्हेगारी रोखणे या त्रिसूत्रीवर पोलिसांनी भर दिला आहे.

पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालात २०२५ या वर्षभरात दाखल एकूण ८० टक्के गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. विशेष म्हणजे, शारीरिक गंभीर गुह्यांमध्ये तपासाचे हे प्रमाण ९९ टक्क्यांवर पोहोचले आहे. मालमत्तेविषयक गुह्यांच्या तपासातही मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढ होऊन तो ५७ टक्क्यांवर गेला आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला १८.३० कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत केला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डॅशबोर्ड प्रणाली, सीसीटीव्ही नेटवर्क, फॉरेन्सिक व्हॅन, हेल्पलाइन व अन्य डिजिटल उपक्रमांमुळे पोलिस सेवांची कार्यक्षमता वाढल्याचेही नमूद करण्यात आले. नवी मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलिस दल कटिबद्ध आहे. भविष्यातही तंत्रज्ञानाधिष्ठित, नागरिकाभिमुख आणि पारदर्शक पोलिसिंगवर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त सचिन गुंजाळ, उपआयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, परिमंडळ-२चे उपायुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत पोलिसांनी वर्षभरात २१५ किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ६३ कोटी आहे. ड्रग्जची विक्री करणाऱ्या मुख्य साखळीवर हल्ला चढवत पोलिसांनी १० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज नष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान पेलताना नवी मुंबई पोलिसांनी गोल्डन अवरमध्ये तातडीने मिळालेल्या तक्रारींमुळे नागरिकांचे सुमारे १० कोटी रुपये बँक खात्यात गोठवले आहेत. १९३० या हेल्पलाइनचा प्रभावी वापर केल्याने शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक टळली आहे.

मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया
शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत १,००० हून अधिक बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अमली पदार्थविरोधी कारवाई, अवैध धंद्यांवर नियंत्रण, वाहतूक शिस्तीचे पालन, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात नवी मुंबई पोलिसांनी प्रभावी कामगिरी केल्याचा दावा केला आहे.

नवी मुंबई पोलिस दलासाठी २०२५ हे वर्ष आव्हानात्मक असले तरी आम्ही अनेक आघाड्यांवर यश मिळवले आहे. ८० टक्के गुन्हे उकल करणे आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत ९९ टक्के कामगिरी करणे, हे आमच्या पथकाच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. महिलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि ती यापुढेही राहील. सायबर गुन्ह्यात आम्ही गोल्डन अवरवर लक्ष केंद्रित करून कोट्यवधी रुपये वाचवले आहेत. नवी मुंबईला नशामुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई

अमली पदार्थ जप्त २१५ किलो
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत ६३ कोटी
अमली पदार्थ नष्ट १० कोटींहून अधिक

बँक खात्यात गोठवले १० कोटी रुपये
चोरीला मुद्देमाल परत १८.३० कोटी

बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा शोध
नायजेरियन ३००
बांगलादेशी ६१८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com