घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Published on

घंटागाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
कल्याण-डोंबिवली शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेला शुक्रवारी (ता. ६) सकाळी मोठा फटका बसला होता. कचरा घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उशिरा पगार मिळत असल्याने व इतर प्रलंबित मागण्यांसाठी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचे काम पूर्णतः ठप्प झाले होते. परिणामी अनेक भागांत सकाळच्या सत्रात कचऱ्याचे ढीग तसेच पडून राहिले. अशात कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
महापालिकेने कचरा संकलनाचा ठेका सुमीत एल्कोप्लास्ट या खासगी कंपनीला दिला आहे. या कंपनीअंतर्गत काम करणारे कामगार शुक्रवारी सकाळी डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील घंटागाडी आगार केंद्रात एकत्र आले आणि त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. प्रशासन व ठेकेदारांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, एकही घंटागाडी रस्त्यावर उतरू न देण्याचा ठाम निर्णय कामगारांनी घेतला. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू राहिल्याने संपूर्ण शहरातील कचरा संकलन व्यवस्था विस्कळित झाली. रस्त्यांवर, वसाहतींमध्ये व सार्वजनिक ठिकाणी कचरा तसाच पडून राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधित ठेकेदाराचे वरिष्ठ अधिकारी व केडीएमसी प्रशासनाने तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत कामगारांशी चर्चा केली. लवकरात लवकर पगार देण्यासह इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले.
---------------
चौकट
कामगारांचा प्रश्न सोडवण्याची मागणी
शुक्रवारी दुपारनंतर घंटागाड्या रस्त्यावर उतरल्या आणि कचरा उचलण्याचे काम पुन्हा सुरू झाले. बहुतांश भागांतील कचरा उचलला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा आंदोलनांमुळे शहराच्या स्वच्छतेवर गंभीर परिणाम होत असल्याने ठेकेदार व कामगार यांच्यातील प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com