अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट
अनधिकृत जाहिरात फलकांचा सुळसुळाट
एपीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा वाशी मार्केटला फटका
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाशी येथील एपीएमसी मार्केट परिसरात अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर व होर्डिंग्जचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या परिसरात नियमांनुसार परवानगीशिवाय जाहिराती लावण्यास मनाई असतानाही सर्रास नियमभंग सुरू असल्याचे दिसून येत आहे.
एपीएमसी अंतर्गत फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला व धान्य अशा पाच प्रमुख बाजारपेठांचा समावेश असून, येथे हजारो व्यापारी, कामगार व हमाल कार्यरत आहेत. या घटकांचे विविध राजकीय पक्षांशी संबंध असल्याने वाढदिवस, अभिनंदन, निवडणूक यश किंवा कार्यक्रमांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर राजकीय जाहिरात फलक लावले जात आहेत. या जाहिरातींवर कारवाई होत नसल्याचा फायदा घेत आता वाणिज्य स्वरूपाच्या जाहिरातीही विनापरवानगी लावल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
विविध खासगी कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांकडून नियमबाह्य पद्धतीने जाहिरात फलक उभारले जात असून, त्यामुळे एपीएमसी प्रशासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून होत आहे. अधिकृत परवानगी घेऊन जाहिरात करणाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासनासह नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकारीही कानाडोळा करत असल्याची चर्चा आहे. अंतर्गत रस्ते, चौक, गेट परिसर, विजेचे खांब व संरक्षक भिंती जाहिरातींनी भरून गेल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक ठिकाणी विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद असतानाही राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे, अपघाताचा धोका व बाजारपेठेच्या सौंदर्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे व्यापारी व नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे एपीएमसी व महापालिकेने संयुक्त कारवाई करून अनधिकृत जाहिरात फलक हटवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.
चौकट
महसुली नुकसान आणि नियमांकडे दुर्लक्ष
अनधिकृत जाहिरात फलकांमुळे एपीएमसी प्रशासनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महसुली नुकसान होत आहे. परवानगी व शुल्क न भरता जाहिराती लावल्या जात असल्याने नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत असून, प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. राजकीय दबावामुळे नियमभंगाकडे दुर्लक्ष होत असल्याने अनधिकृत जाहिरातींना मोकळे रान मिळाले आहे.
सानपाडा शिवाजी चौक बॅनरबाजीमुळे विद्रूप
जुईनगर, ता. ७ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर १० मधील शिवाजी चौक सुशोभीकरणानंतर काही दिवसांतच अनियंत्रित बॅनरबाजीमुळे विद्रूप झाल्याचे चित्र आहे. जून महिन्यात खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या चौकाचे उद्घाटन झाले होते. किल्ल्याच्या बुरुजासारखी रचना, मावळ्यांच्या प्रतिकृती व भगवा ध्वज यामुळे चौक आकर्षक बनला होता. मात्र, सण, उत्सव व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने लावलेल्या बेकायदेशीर बॅनर, फ्लेक्स व पोस्टरमुळे चौकाचा बकालपणा वाढला आहे. करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले जाते. मात्र, देखभाल व नियंत्रणाअभावी काही दिवसांतच सार्वजनिक ठिकाणे विद्रूप होतात. बॅनरबाजीवर ठोस नियंत्रण व दंडात्मक कारवाई न झाल्यास अशा प्रकल्पांचा उद्देशच फसणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

