चार लेबर कोडविरोधात राज्यव्यापी श्रम परिषद
चार लेबर कोडविरोधात राज्यव्यापी श्रम परिषद
१२ फेब्रुवारीला देशव्यापी संपाचा इशारा
शिवडी, ता. ८ (बातमीदार) ः केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात मुंबईत कामगार-कर्मचारी राज्यव्यापी श्रम परिषद पार पडली. या परिषदेत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एकदिवसीय संप यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. करी रोड येथील महाराष्ट्र हिंदू सभेच्या म्युनिसिपल मजदूर युनियनच्या बाळ दंडवते सभागृहात शुक्रवारी ‘कामगार विरोधी चार लेबर कोड’ या विषयावर परिषद झाली. हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी हरभजन सिंग सिद्धू यांनी या वेळी प्रमुख मार्गदर्शन केले.
सिद्धू म्हणाले की, केंद्र सरकारने ४४ केंद्रीय कामगार कायद्यांपैकी २९ कायद्यांचे चार लेबर कोडमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत आहे. कामगारांचा संपाचा अधिकार मर्यादित होणार असून, १ एप्रिलपासून कामगार संघटना स्थापन करणे अधिक कठीण होईल, असा आरोप त्यांनी केला. या धोरणांविरोधात सर्व केंद्रीय कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला असून, कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशातील १४० कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ६४ कोटी कामगार आहेत. राष्ट्रीय आर्थिक अहवालानुसार सुमारे ७० लाख नोकऱ्या रिक्त असून, त्या भरण्यात आलेल्या नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. सार्वजनिक उद्योग, पोर्ट, रेल्वे, कोळसा क्षेत्रात कंत्राटी कामगारांची संख्या वाढत असून, त्यांना न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. परिषदेत महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष निवृत्ती धुमाळ यांनी स्वागत केले. जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी प्रास्ताविक केले, तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी आभार मानले.
या वेळी हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले, उपाध्यक्ष कॉ. वेणू नायर, एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, अध्यक्ष संदीप शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, उपाध्यक्ष वामन कविस्कर, महिला नेत्या संज्योत वढावकर, रंजना आठवले, शीला भगत, बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, ठाकरे, प्रदीप शिंदे, विकास गुप्ते, व्यंकटेश स्वामी, बबन मेटे, मुकुंद वाजे, सलीम झगडे, उपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

