ठाण्यात ‘माणिक स्वर संगीत’चा नादमय महोत्सव

ठाण्यात ‘माणिक स्वर संगीत’चा नादमय महोत्सव

Published on

ठाण्यात ‘माणिक स्वर संगीत’चा नादमय महोत्सव
स्वर, परंपरा आणि साधनेचा अविस्मरणीय संगम

ठाणे, ता. ८ (बातमीदार) : पद्मश्री स्वर्गीय माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत गडकरी रंगायतन, ठाणे येथे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित ‘माणिक स्वर संगीत’ या दोनदिवसीय संगीत महोत्सवाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा आणि त्याची जिवंत परंपरा रसिकांसमोर उलगडली.
ठाणे महापालिकेच्या सहयोगाने, माणिक वर्मा फाउंडेशन आणि आयटीसी संगीत रिसर्च अकादमी (आयटीसी-एसआरए), कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माणिक स्वर संगीत’ हा दोन दिवसांचा संगीत महोत्सव गडकरी रंगायतनमध्ये रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षातील हा महोत्सव स्वर, साधना आणि स्मृती यांचा अर्थपूर्ण उत्सव ठरला. महोत्सवात आयटीसी-एसआरएच्या तरुण विद्यार्थ्यांपासून ते सिद्धहस्त दिग्गज कलाकारांपर्यंत अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आयटीसी-एसआरएची विद्यार्थिनी मौपाली चौधरी यांनी राग बिहाग आणि नाट्यपद सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर देबोश्री भट्टाचार्य यांनी राग बागेश्री सादर करून सभागृहात शांत, अंतर्मुख वातावरण निर्माण केले.
यावेळी ‘माणिक रत्न २०२६ पुरस्कार’ शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांना पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना पंडित कशाळकर यांनी माणिक वर्मा यांच्या गायकीचा आपल्या संगीतमय प्रवासावर झालेला प्रभाव भावपूर्ण शब्दांत व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी राग कौशीकानडा सादर करत रसिकांना तल्लीन करणारा अनुभव दिला.
--------------
शास्त्रीय संगीताचे सादरीकरण
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्रेया चॅटर्जी यांनी राग आहिरभैरव सादर करून भक्तिरस जागवला. त्यानंतर ओंकार दादरकर यांच्या राग जौनपुरीने कार्यक्रमात रंग भरले. महोत्सवाची सांगता पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या राग गुजरी तोडी आणि शुद्ध सारंगमधील प्रभावी सादरीकरणाने झाली. तबला, संवादिनी, हार्मोनियम आणि तानपुरावरील सहकलाकारांच्या संवेदनशील संगतीमुळे प्रत्येक सादरीकरण अधिक खुलत गेले. ‘माणिक स्वर संगीत’ हा केवळ महोत्सव न राहता, भारतीय शास्त्रीय संगीताचा जिवंत वारसा अनुभवण्याचा एक संस्मरणीय क्षण ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com