जाहिरात लेख
मोतीलाल ओसवाल सदर
सेल : लक्ष्य - १७५
सेल (स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.)ने या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ठरल्यानुसारच कामगिरी केली आहे. त्यांनी स्टीलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले असल्याने विक्रीची किंमत कमी मिळाल्याचा तोटा भरून निघाला. त्यायोगे त्यांनी खर्चावर नियंत्रण आणि सुधारलेले कामकाज दाखवून दिले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची त्यांची विक्री १६ टक्के वाढून ५१ लाख टनांवर गेली. जादा माल थोड्या कमी किमतीत विकल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेचा विस्तार केल्याने त्यांना हे शक्य झाले. अशी जवळपास २४ लाख टन विक्री केल्यामुळे त्यांचे खेळते भांडवलही मोकळे झाले आणि त्यांचा ताळेबंदही सक्षम झाला. एकंदर सरासरी किंमत थोडी कमी असली तरी वाढीव विक्रीचे फायदे मिळाल्याने तसेच कोळशाचे भाव या तिमाहीत स्थिर राहिल्यामुळे आणि खर्चावर नियंत्रण ठेवल्याने नफाक्षमता स्थिर राहिली. व्यवस्थापनाने नजीकच्या भविष्यकाळासाठी चांगला आशावाद वर्तवला आहे. जानेवारीत होणारी किंमतवाढ ही फेब्रुवारीच्या विक्रीत प्रतिबिंबित होईल, तर चौथ्या तिमाहीत वाढीव साठा कमी किमतीत विकण्याचे प्रमाणही कमी होईल आणि जवळपास सर्व प्रमुख कारखान्यांमध्ये काम सुरळीत होईल, असा व्यवस्थापनाचा अंदाज आहे. मध्यम कालावधीतही कामगिरी चांगली राहील. या कालावधीत त्यांचे विक्रीचे लक्ष्य साधले जाईल. तसेच आधुनिकीकरण आणि कार्यक्षमतेसाठी भांडवल गुंतवणूक केल्याचा फायदाही त्यांना होईल. त्यामुळे या चक्रात त्यांची खर्च स्पर्धात्मकता सुधारेल.
---------
निप्पॉन लाइफ इंडिया एएमसी : लक्ष्य - ८६२
निप्पॉन लाइफ इंडिया एएमसीने नुकत्याच संपलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. त्यांना मिळणारा चांगला परतावा, खर्चावर ठेवलेले शिस्तबद्ध नियंत्रण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्ती क्षेत्रात त्यांनी वाढवलेला आपला बाजारवाटा, याचा फायदा त्यांना मिळाला आहे. काही ईटीएफपासून कमी उत्पन्न मिळत असले तरी त्यांच्या महसुलातील वाढ चांगली राहिली आहे. कारण त्यांनी जास्त उत्पन्न देणाऱ्या वस्तूंच्या ईटीएफमधील आपला व्यवसाय वाढवला आहे. तसेच त्यांना जास्त संख्येने गुंतवणूकदार मिळाल्यामुळे एसआयपीमधून मिळणारे उत्पन्नही चांगले आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्याने महसुलापेक्षा खर्च कमी प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे नफा आणि नफाक्षमता वेगाने वाढत आहेत. सर्व क्षेत्रात त्यांचा बाजार वाटा वाढत असून, ईटीएफमध्ये त्यांना बाजारात अग्रगण्य स्थान मिळाले आहे, तर शेअर आणि एकंदर व्यवस्थापनाखालील मालमत्तादेखील चांगलीच वाढली आहे. स्पेशालिस्ट इन्व्हेस्टमेंट फंड, परदेश व्यवहार, गिफ्ट सिटी योजना, खासगी वित्तपुरवठा अशा आकर्षक संधींसह कमिशनचे व्यवसाय तसेच डिजिटल माध्यमातून व्यवसाय होत असल्याने त्याचा फायदाही त्यांना मिळेल. वाढीव फायदे, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, बाजारातील नेतृत्व आणि आगामी पर्यायी उत्पादने यामुळे कंपनीची मध्यम कालावधीतील वाढ आणि नफाक्षमता चांगली राहील.
-----
सिरम एस जी एस टेक्नॉलॉजी : लक्ष्य - १,०००
सिरम एस जी एस टेक्नॉलॉजीची, इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपनी म्हणून या तिमाहितील कामगिरी अत्यंत उत्तम झाली असून आपल्या वेगवेगळ्या व्यवसायांचा तसेच स्थिर खर्च कमी असण्याचा फायदा त्यांना होत आहे. आयटी, रेल्वे या व्यवसायातून मिळणारा चांगला महसूल, तसेच आरोग्य सेवा, उद्योगधंदे, वाहन व्यवसाय आणि ग्राहक या क्षेत्रातील विक्री तसेच निर्यातीत होणारी वाढ आणि डिझाइन उत्पादक ही ख्याती, यामुळे त्यांची नफाक्षमता चांगलीच वाढली आहे. त्यांचे यावर्षीचे ऑर्डर बुक सक्षम असून त्यातून त्यांची अनेक वर्षांची विविध प्रमुख क्षेत्रातील मागणी दिसत असून मोठी महसूलनिर्मिती दृष्टिपथात आली आहे. व्यवस्थापनाने आपल्या वार्षिक आढाव्यात कंपनीच्या वाढ क्षमतेची खात्री व्यक्त केली असून वाढती निर्यात, खेळत्या भांडवलाचे शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भरपूर रोख रक्कम असलेला ताळेबंद या प्रमुख बाबी दाखवून दिल्या आहेत. एलकोमचे केलेले अधिग्रहण, कोरियन कंपनीबरोबर संयुक्त प्रकल्पात प्रिंटेड सर्किट बोर्ड उत्पादनासाठी केलेला विस्तार आणि जास्त उत्पन्न देणाऱ्या उद्योग आणि वाहननिर्मिती क्षेत्रावर दिलेला भर यामुळे त्यांची दीर्घकालीन स्पर्धात्मकता आणि महसूलनिर्मिती वाढली असून त्यामुळे ही कंपनी मध्यम कालावधीसाठी गुंतवणुकीस योग्य झाली आहे.
--------
आयसीआयसीआय बँक : लक्ष्य - १,७५०
आयसीआयसीआय बँक आपल्या दर्जेदार कर्जांमुळे आणि धोक्याचे व्यवस्थापन करण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीमुळे आपल्या व्यवसायाची ताकद सतत दाखवून देत आहे. त्यांच्या कर्जाची वाढ उत्तम प्रकारे होत असून छोट्या कर्जदारांना दिलेली सुरक्षित कर्जे, व्यावसायिक उद्योजकांसाठी बँकिंग सेवा आणि कंपन्यांना दिलेली कर्जे वाढणे यामुळे त्यांनी दिलेल्या कर्जाचा आलेख सतत चढा आहे. त्याचवेळी असुरक्षित कर्जाबाबतही बँकेने अति सावधगिरी बाळगली असून मुळात अशी कर्जे देताना काटेकोर काळजी घेऊन त्यावर तीक्ष्ण नजरेने देखरेखही केली जाते. कर्जांची व्यवस्थित वसुली आणि त्यात आकस्मिक प्रसंगांसाठी केलेली सुरक्षा तरतूद यामुळे या कर्जमालमत्तेचा दर्जाही चांगला राहिला आहे. काही खात्यांमध्ये थोडी तडजोड करावी लागली तरी कर्जाच्या खर्चावरही नियंत्रण ठेवण्यात आले आहे, तर त्यांच्या देण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी, त्यांच्यावरील वेगवेगळे व्याज व स्थिर तरलता यामुळे नफा क्षमतेवर परिणाम न होता ताळेबंद व्यवस्थित राहिला आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानात आणि वितरण यंत्रणेत गुंतवणूक करूनही खर्चावर शिस्तबद्ध नियंत्रण राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी यांचा कार्यकाल वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्यामुळे नेतृत्वाविषयीची अनिश्चितता संपून धोरणे आणि अंमलबजावणी यांच्यातील सातत्य कायम राहील. एकंदरीत आयसीआयसीआय बँक ही सातत्य, सक्षम प्रशासन आणि सर्व चक्रांमध्ये सातत्यपूर्ण नफा देण्याची क्षमता यामुळे सर्वांपेक्षा वेगळी राहिली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मोठ्या बँकिंग व्यवसायात ती सर्वात जास्त विश्वासार्ह आहे.
------
डेल्हीवरी : लक्ष्य - ५८०
डेल्हीवरीने या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली असून, आपल्या प्रमुख वाहतूक व्यवसायात चांगली वाढ नोंदवून नफाक्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. या तिमाहीत त्यांचा महसूल मागील वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा अठरा टक्के वाढून २८ अब्ज रुपयांवर गेला, तर ईबीआयटीडीएदेखील मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत दुप्पट वाढून २.१ अब्ज रुपयांवर गेला. त्यामुळे त्यांची नफाक्षमता ७.४% वाढली आहे. स्थिर खर्चावरील नियंत्रण आणि यंत्रणेतील कार्यक्षमता यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे. एक्सप्रेस पार्सल आणि पार्ट ट्रक लोड हे विभाग त्यांच्या वाढीतील प्रमुख घटक राहिले आहेत. यातील त्यांची उलाढाल अनुक्रमे मागील वर्षापेक्षा अनुक्रमे ४३ टक्के आणि २३ टक्के वाढली आहे. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी, मार्गांच्या सुसूत्रीकरणाचा मिळालेला फायदा आणि उद्योग क्षेत्र स्थिर होत असताना मिळालेला वाढीव बाजार वाटा, याचा फायदा त्यांना झाला. सेवा विभागातील ईबीआयटीडीए नफाक्षमता, एक्स्प्रेस विभागात १८.१% आणि पीटीएल विभागात ११ टक्के वाढली. त्यांना मिळणारा चांगला परतावा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुकूल असे वैविध्यपूर्ण ग्राहक हेच त्यातून परावर्तित होते. पुरवठासाखळी सेवा विभागात नफा क्षमता वाढली. आपल्या कामाच्या करारांच्या फेरवाटाघाटी आणि फेररचना केल्याने आणि परदेश व्यवसायही समाधानकारक राहिल्याने तसेच खर्चावरील नियंत्रणामुळे एकंदरीत नफा क्षमताही चांगली राहिली. व्यवस्थापनाने यापुढेही व्यवसायाची गती चांगली राहील, असे नमूद केले असून इकॉम एक्स्प्रेसचे एकत्रीकरण तसेच आर्थिक वर्ष २०२२ ते २५ दरम्यान भांडवली खर्च केल्यामुळे भांडवलाची कमी झालेली गरज आणि डेल्हीव्हरी डायरेक्ट तसेच रॅपिड यांच्या नव्या योजना वाढवल्याने त्याचा फायदा त्यांना होईल. त्यामुळे मध्यम कालावधीसाठी कंपनी, चांगली नफा क्षमता आणि मोठा रोख प्रवाह निर्मितीकरिता सज्ज झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

