विजयनगरमधील प्रलंबित रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त
महेश गायकवाड यांचा आंदोलनाचा इशारा
कल्याण ता. ९ (बातमीदार) : कल्याण पूर्व भागातील तिसगाव पाडा ते १०० फुटी रोड दरम्यानचा मंजूर डी. पी. रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने स्थानिक नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. या समस्येची गंभीर दखल घेत शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक महेश गायकवाड यांनी सोमवारी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. रस्ता अडवून धरणाऱ्या जमीनमालकांवर आणि दिरंगाई करणाऱ्या प्रशासनावर त्यांनी या वेळी तीव्र संताप व्यक्त केला.
पुणे लिंक रोड ते सम्राट अशोक विद्यालय आणि पुढे १०० फुटी रोडपर्यंत जाणारा नऊ मीटर रुंदीचा रस्ता मंजूर आहे. मात्र, शाळेपासून काही अंतरावरच एका स्थानिक जमीनमालकाने काम अडवून ठेवल्याने पेच निर्माण झाला आहे. या अर्धवट रस्त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य असून, खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. नुकतीच एका वृद्ध महिलेला याच रस्त्यावर ठेच लागून गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून महेश गायकवाड यांनी तत्काळ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर आणि संबंधित इंजिनिअर्सना घटनास्थळी बोलावून घेतले. ‘‘जमिनीच्या तांत्रिक बाबी लवकरात लवकर सोडवा आणि हा रस्ता रहिवाशांसाठी खुला करा. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,’’ अशा शब्दांत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
आंदोलनाचा इशारा
गायकवाड यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, ‘‘जर नजीकच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल.’’ नगरसेवकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या पुढाकारामुळे आता वर्षानुवर्षे रखडलेल्या या रस्त्याला गती मिळेल, अशी आशा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

