वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात

वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात

Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नवी मुंबई शहर सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. २०२५ या वर्षात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल नऊ लाख ८० हजार ८०६ वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२४ या मागील वर्षाच्या तुलनेत कारवायांच्या संख्येत सुमारे ९३ हजारांनी वाढ झाली आहे. एकीकडे कारवायांचा आकडा वाढत असतानाच, अपघाती मृत्यूच्या संख्येत झालेली घट ही शहरवासीयांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

हेल्मेट नसलेल्यांवर सर्वाधिक कारवाई
वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरील कारवाईने उच्चांक गाठला आहे. २०२४ मध्ये १,७७,६२१ असणारा हा आकडा २०२५ मध्ये २,०३,४३७ वर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ सिग्नल जंपिंगच्या केसमध्येही मोठी वाढ (४६,०७७ वरून ७२,८६१) झाली असून, बेशिस्त चालकांवर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे.

अपघातांत घट, जीव वाचवण्यात यश
वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाली आहे. २०२४ मध्ये २८६ जीवघेणे अपघात झाले होते, ही संख्या २०२५ मध्ये २६७ वर आली आहे. म्हणजेच १९ जणांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. जखमींच्या संख्येतही २० ने घट झाली आहे.

कोटींची दंडवसुली आणि जनजागृती
नवी मुंबई वाहतूक विभागाकडून केवळ दंड आकारणे, हा उद्देश न ठेवता जनजागृतीवरही भर दिला जात आहे. २०२५ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून तब्बल १४.८८ कोटींचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून ५.९६ कोटी दंड जमा झाला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे, हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे. सीसीटीव्ही आणि इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपआयुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग

नवी मुंबईतील कारवाईचा लेखाजोखा
उल्लंघनाचा प्रकार २०२५ मधील प्रकरणे २०२४ मधील प्रकरणे
विनाहेल्मेट प्रवास २,०३,४३७ १,७७,६२१
सिग्नल तोडणे ७२,८६१ ४६,०७७
धोकादायक वाहन चालवणे ३,४७१ १,५९७
वेगमर्यादा उल्लंघन १,११,७७७ १,२२,५५९
मद्यप्राशन करून वाहन चालवणे २,४२६ २,१५१
एकूण प्रकरणे ९,८०,८०६ ८,८७,७७०

चालकांच्या आरोग्याची काळजी
वर्षभरात बैठका ३५९
जनजागृतीपर कार्यक्रम ४,२५८
आरोग्य शिबिरे ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com