दुर्मिळ सोनसावर वृक्षाला बहर
दुर्मिळ सोनसावर वृक्षाला बहर
शहापूरच्या डोंगरात फुलले ‘निसर्गाचे पिवळे लेणे’
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ९ : निसर्गाचा अनमोल ठेवा असलेल्या शहापूर तालुक्यातील डोंगररांगांमध्ये अत्यंत दुर्मिळ सोनसावर हा वृक्ष सध्या सोनेरी पिवळ्या फुलांनी बहरला आहे. सर्वसाधारणपणे लाल, केशरी रंगांची फुले येणारी शेवरी सर्वपरिचित आहे, परंतु सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येणारी सोनसावर अत्यंत दुर्मिळ मानली जाते. सध्या ही पिवळ्या फुलांची दुर्मिळ सोनसावर तालुक्यातील कसारा घाटाचा परिसर, तानसा अभयारण्य, माहुली गडावरील जंगल आणि आसनगावच्या जंगलात या सोनसावरीचे दर्शन झाल्याचे वनस्पती अभ्यासक आणि वन्यजीव प्रेमी असलेल्या रोहिदास डगळे यांनी या वृक्षाची नोंद घेतली आहे व या वृक्षाच्या संवर्धनाची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
सोनसावर हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष आहे. जानेवारी महिन्यात पानगळ झाल्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांच्या दरम्यान या वृक्षाला मोठी आकर्षक फुले येतात. या वृक्षाला धार्मिक महत्त्वदेखील असून, ही फुले महादेवाला वाहिली जातात. या वृक्षाचे आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा असून, या वृक्षाची पाने, साल आणि खोड यांचा वापर कावीळ, दमा, त्वचारोग आणि विविध शारीरिक व्याधींवरील पारंपरिक औषधांमध्ये केला जातो. याच्या खोडांपासून मिळणारा डिंक कतिरा या नावाने ओळखला जातो. जो अत्यंत औषधी आहे. तसेच याच्या फळातील मऊ कापूस उशा भरण्यासाठी वापरला जातो.
इंग्रजीमध्ये याला ‘टॉर्च ट्री’ म्हणतात, कारण याच्या वाळलेल्या फांद्या मशालीसारख्या दीर्घकाळ जळत राहतात. सध्या हा वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असून, त्याच्या नैसर्गिक पुनरुत्पादनाचे प्रमाण कमी असल्याने निसर्गप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वृक्षाचे जतन करण्याची गरज वर्तविण्यात येत आहे.
वनसंपदा वाचवण्याची गरज
वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि औषधी डिंकासाठी होणारी वृक्षांची छाटणी यामुळे दुर्मिळ अशा सोनसावरचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शहापूर तालुक्यात वनक्षेत्र घटू लागले असताना येथील वनसंपदा वाचविणे काळाची गरज बनली आहे.
निवडक भागात सोनसावरचे दर्शन
सोनसावर हा वृक्ष शहापूर तालुक्यात मोजक्या निवडक भागात आढळत असून, या वृक्षाची फुले निसर्गातील पक्षी, प्राणी यांना आकर्षित करतात. हे झाड स्वतःच्या वंश वाढीसाठी पाणी, पक्ष्यांकडून परागीभवन करून घेतात. अशी महत्त्वाची कार्य करणारी झाडे आजच्या या काळात दुर्मिळ होत चालली असून, सरकारी पातळीवर अशा अनोख्या व पारंपरिक नैसर्गिक वृक्षांची लागवड करून त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- रोहिदास डगळे, माजी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य
फोटो - 300, 301
फोटो - शहापूर : तालुक्यातील जंगलात पिवळी फुले देणारी दुर्मिळ सोनसावर बहरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

