

एक लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
ठाणे जिल्ह्यात सहा भरारी पथके तैनात
ठाणे, ता. ९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. ठाणे जिल्ह्यातून यंदा एकूण एक लाख आठ हजार ९९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, जिल्हा प्रशासनाने परीक्षेची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी एकूण १९३ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, बाकावर क्रमांक टाकणे यासह सर्व तांत्रिक तयारी सोमवारीच पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील केंद्र नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि परीक्षा ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पडावी, यासाठी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक आणि निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक व मुख्याध्यापकांचा समावेश आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘‘परीक्षेला जाताना अनेक विद्यार्थी दडपणाखाली असतात, ज्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे आणि कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त परीक्षा द्यावी,’’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
महिला विशेष पथक
विद्यार्थिनींच्या तपासणीसाठी स्वतंत्र महिला पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तालुकानिहाय स्वतंत्र पथकेही लक्ष ठेवून असणार आहेत.
संवेदनशील केंद्र
महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंबरनाथ हे परीक्षा केंद्र संवेदनशील जाहीर केले असून, या केंद्रावर बैठे पथक नियुक्त केलेले आहे. तसेच संवेदनशील केंद्रावर इतर केंद्रप्रमुख व कर्मचारीवर्ग परीक्षा कामकाजासाठी नियुक्त केला आहे.
झेरॉक्सची दुकाने बंद
जिल्ह्यांतील परीक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊन नयेत, म्हणून सर्व परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात पोलिस अधिनियम ३७ (१) (३) चा वापर करण्याबाबत तसेच अशा केंद्रावर पोलिस अधिनियम ३७ (१) (३) लावूनही बाह्य उपद्रव कमी होत नसेल, तर अशा केंद्रावर १४४ कलम लागू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परीसरातील झेरॉक्सची दुकाने बंद राहतील यांची दक्षता घेण्याबाबत पोलिस यंत्रणाना सूचित केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी कानमंत्र
१. वेळेचे नियोजन : परीक्षा केंद्रावर पेपर सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी पोहोचा. ऐनवेळी होणारी घाई टाळल्याने मन शांत राहते.
२. साहित्याची खात्री : हॉल तिकीट (प्रवेशपत्र), किमान दोन काळे/निळे पेन, पेन्सिल, रबर आणि स्केल आजच कंपास पेटीत तपासून ठेवा.
३. प्रवेशपत्र : हॉल तिकीट विसरू नका. त्याची एक झेरॉक्स प्रत घरी पालकांकडे सुरक्षित ठेवून द्या.
४. शांत चित्त : पेपर हातात आल्यावर आधी संपूर्ण प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा. सोपे वाटणारे प्रश्न आधी सोडवा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
५. पुरेशी झोप आणि आहार : परीक्षेच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. सकाळी हलका नाश्ता करून आणि पाणी सोबत घेऊनच केंद्रावर जा.
पालकांसाठी सल्ला
मुलांवर गुणांच्या टक्केवारीचा दबाव टाकू नका.
त्यांना सकारात्मक आणि तणावमुक्त वातावरण द्या.
परीक्षेहून आल्यावर पेपर कसा गेला, यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा पुढच्या पेपरसाठी त्यांना प्रोत्साहित करा.
महत्त्वाची आकडेवारी :
एकूण विद्यार्थी : १,०८,९९८
परीक्षा केंद्रे : १९३
भरारी पथके : ०६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.