एक मिनिट उशीर झाल्यास वर्ष वाया
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेणाऱ्या येणाऱ्या बारावी परीक्षेची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात तब्बल ३३ हजार १२१ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पनवेल तालुक्यामधून १२,२५२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा केंद्रात वेळेआधी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेसाठी एक मिनिट उशीर झाला तरी परीक्षा केंद्रात यंदा प्रवेश मिळणार नाही, अशा स्पष्ट सूचना मंडळाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून बारावी परीक्षेकडे पाहिले जाते. ही परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी सध्या पूर्ण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारावीची परीक्षा ५२ केंद्रांवर होणार असून, पनवेल तालुक्यात १२ केंद्रे आहेत. बारावीची परीक्षा सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून दरवर्षीप्रमाणे वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय, बैठी पथके नेमण्यात आली आहेत. यांच्याशिवाय सहाय्यक परिरक्षक (रनर) हेही बैठे पथक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीची सोय करण्यात आली.
आजारी असणाऱ्यांनी औषधे जवळ बाळगावीत
परीक्षा केंद्रात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची केंद्रप्रमुख व संबंधित यंत्रणांनी तपासणी करावी. विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळणार नाही, याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे. पेपर ११ वाजता असेल, तर विद्यार्थ्यांनी पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे. सोबत पिण्याच्या पाण्याची बाटली आणावी. यंदापासून मंडळाकडून परीक्षा हॉलमध्ये पाणी मिळणार नाही, पण परीक्षा केंद्राच्या व्हरंड्यात पाण्याची सोय करण्यात येणार आहे. ज्यांना बीपी किंवा शुगर आहे, अशांना बिस्किटे किंवा अन्य खाद्यपदार्थ जवळ ठेवण्यास मुभा असेल. आजारी असणाऱ्यांना औषधे जवळ बाळगण्याची परवानगी असेल, पण संबंधितांना याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवणे गरजेचे आहे. प्रवेशपत्रावरील सर्व सूचनांचे विद्यार्थ्यांनी पालन करावे, असे प्रशासनाने सांगितले.
मंडळाच्या सूचना
उत्तरपत्रिकेवर मोबाइल क्रमांक किंवा ओळख पटेल, असा मजकूर लिहू नका. अशा गोष्टी उत्तरपत्रिकेवर लिहिल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात येईल. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर ती लगेच सर्व बाजूंनी पाहावी, फाटलेली असेल, तर बदलून घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर त्यावरील कोड तपासावा. ती आपल्याच माध्यमाची आहे का, हे पाहावे. कानातील बड्स किंवा अन्य इलेक्टॉनिक वस्तू जवळ बाळगू नये. त्या आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

