महापालिकेत आयुक्तांचा शिस्तीचा चाबूक

महापालिकेत आयुक्तांचा शिस्तीचा चाबूक

Published on

महापालिकेत आयुक्तांकडून शिस्तीचा चाबूक!
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तासभर प्रवेश नाकारला
उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : घड्याळाच्या काट्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी (ता. ९) सकाळी थेट प्रशासकीय कारवाईचा दणका बसला. उल्हासनगर महापालिकेतील लेटलतीफपणाला लगाम घालण्यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी ‘वेळेवर या, नाहीतर बाहेरच थांबा’ असा कडक पवित्रा घेतला. सोमवारी सकाळी उशिरा येणाऱ्या ३० ते ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल एक तास महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच रोखून धरण्यात आले.

महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणि वेळेचे पालन व्हावे, यासाठी आयुक्त आव्हाळे यांनी सोमवारी सकाळी अचानक मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तपासणी केली. सकाळी ठरलेली वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षकांमार्फत प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, सुमारे ४० अधिकारी-कर्मचारी एक तास प्रवेशद्वाराबाहेर उभे होते. या अचानक झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


आयुक्तांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत उशिरा येणाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या, ‘‘महापालिकेचे प्रत्येक काम सामान्य नागरिकांशी निगडित आहे. जर नागरिक कार्यालयीन वेळेत कामासाठी येऊ शकतात, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शिस्त ही ऐच्छिक नसून ती प्रत्येकासाठी बंधनकारक आहे.’’

कडक कारवाईचा इशारा
केवळ ताकीद देऊन न थांबता, आयुक्तांनी स्पष्ट इशारा दिला की, यापुढेही कामात हलगर्जी किंवा शिस्तभंग आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल. या कारवाईचा मुख्य उद्देश प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे आणि नागरिकांना वेळेत सेवा देणे हा असल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिकांकडून निर्णयाचे स्वागत
आयुक्तांच्या या निर्भीड भूमिकेचे शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. अशा कडक शिस्तीमुळे प्रशासनाची विश्वासार्हता वाढेल आणि कर्मचाऱ्यांच्या दांडीबहाद्दर प्रवृत्तीला चाप बसेल, अशी आशा व्यक्त होत आहे. ‘वेळेची शिस्त म्हणजेच प्रशासनाची विश्वासार्हता’ हा संदेश या कारवाईतून स्पष्टपणे देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com