फसवणूक बहाद्दर सराईत टोळीचा पर्दाफाश
फसवणूक बहाद्दर सराईत टोळीचा पर्दाफाश
ज्वेलर्स व्यावसायिकासह चौघांना अटक; १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : सामान्य वृद्ध लोकांना बोलण्यात गुंतवून, भुरळ घालून, हातचलाखी करून, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे शहर पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ या पथकाला यश आले आहे. या टोळीतील चौघांना अटक केली असून, त्यामध्ये एका ज्वेलर्स व्यावसायिकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून १३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी ठाणे आणि मुंबईतील बारा गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सोमवारी (ता. ९) ठाण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळालेली माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ठाणे व मुंबई परिसरात माहिती काढून ते गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागोवा काढण्यात आला. याचदरम्यान मुंबईतील राजु प्रकाश चव्हाण (वय ४८), रमेश विजयकुमार जैस्वाल (वय ४९) आणि संजय दत्ताराम मांगडे (वय ५३) त्या तिघांना २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता, त्यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ठाणे जिल्हा व मुंबई मध्ये केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकल्याचे सांगितले, तर काही मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील आरोपींकडून मुद्देमाल घेऊन त्याची विल्हेवाट लावण्यास मदत करणारा मुंबईतील ज्वेलर्स व्यावसायिक रामसिंग लालसिंग चौहान (वय ४५) याला अटक करण्यात आली. तसेच त्या चौघांकडून ठाणे, मुंबई शहर परिसरातील एकूण १२ गुन्ह्यांमधील एकूण १३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे १६ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई गुन्हे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय काजारी, पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे, पोलिस शिपाई अशोक थोरवे, पोलिस हवालदार योगेश वाघ, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, मंगेश जाधव, गणेश गावडे यांनी केलेली आहे.
-------------------
ठाणे शहर परिसरात मागील अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना घडत होत्या. नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ मध्ये, तर या घटनांमध्ये वाढ झाली होती. याबाबत शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ युनिट कार्यालयाकडून त्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ विशेष मोहीम राबविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

