ठाण्यात १ मेपासून जणगणनेला सुरुवात
ठाण्यात १ मेपासून जनगणनेला सुरुवात
पाच हजार ७०० प्रगणकांची होणार नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : शासनाच्या वतीने २०११ नंतर आता जनगणना कर्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे महापलिका क्षेत्रातील जनगणनेला १ मेपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील घरे, इमारती आणि कुटुंबांची सविस्तर मोजणी करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय प्रगणक गट तयार करण्यात येणार असून, पाच हजार ७०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १२ लाख ६१ हजार इतकी आहे. यंदाची जनगणना अधिक व्यापक आणि महत्त्वाची ठरणार आहे. जनगणनेसाठी ठाणे मनपा क्षेत्रात पाच हजार ७०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार असून, प्रत्येक सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील घरे, इमारती आणि कुटुंबांची सविस्तर नोंद केली जाणार आहे. हा टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार असून, घरांची यादी तयार केली जाणार आहे. प्रत्येक प्रगणकाला सुमारे १८० ते २०० घरांची मोजणी करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. दुसरा टप्पा १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान होणार असून, यामध्ये नागरिकांची वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिजिटल पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमार्फत उपलब्ध असलेला जन्म-मृत्यू नोंद, कुटुंब नोंदणी, लसीकरणा संबंधीचा डेटा संकलित करून त्याची छाननी सुरू आहे. या आधीच्या माहितीतून प्रत्यक्ष सर्वेक्षण अधिक अचूक होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
----------
दरम्यान, २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे १८.४ लाख इतकी होती. गेल्या काही वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने यंदाची जनगणना अधिक व्यापक स्वरूपात केली जाणार आहे. जनगणना पूर्ण झाल्यानंतर तिचा संदर्भ दिनांक १ मार्च २०२७ असा निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी जनगणना कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.

