नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

Published on

विक्रम गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी नवी मुंबई पोलिस दलाने कंबर कसली आहे. वाहतूक पोलिसांच्या अंगावर आता बॉडी वॉर्न कॅमेरे दिसणार असून, पोलिस वाहनेदेखील आता डॅश कॅमने सज्ज होणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कामात अचूकता तर येईलच शिवाय वाहनधारकांशी होणारे वाद आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींनाही लगाम बसणार आहे. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली असून, या प्रकल्पासाठी निधीची तरतूद आणि अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) ठाणे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. यात एकूण ४३० बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचा प्रस्ताव असून त्यासाठी १.९७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात ९८.८ लाख रुपये वितरित झाले असून, २३० कॅमेऱ्यांच्या खरेदीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे पोलिस वाहनांसाठी १०० डॅश कॅमेऱ्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत मंत्रालयाकडून तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया सुरू असून, या कॅमेऱ्यांच्या चाचण्या प्रगतीपथावर आहेत.

अनेकदा वाहतूक नियम मोडल्यावरून पोलिस आणि नागरिक यांच्यात खटके उडतात. अशा वेळी बॉडी वॉर्न कॅमेरा हा ठोस पुरावा म्हणून काम करेल. तसेच, पोलिस वाहनांवरील डॅश कॅमेऱ्यांमुळे रस्ते अपघात किंवा गुन्हेगारी घटनांचे थेट चित्रीकरण उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढणार असून गुन्हेगारीला चाप बसणार आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरील खोट्या आरोपांना आळा बसेल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर राहील. तसेच डिजिटल पुराव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियेत मदत होणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस दलाला अधिक कार्यक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे पोलिसांच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि डॅश कॅमऱ्यांमुळे गस्ती दरम्यानच्या घटनांचे अचूक दस्तऐवजीकरण होईल. यामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वासार्हता अधिक वाढेल.
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com