पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत

पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच सेवेत

Published on

तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय सेवा विभागामार्फत नेरूळ विभागातील जुईनगरमधील सेक्टर २४ येथील भूखंड क्रमांक ५ व ६ वर उभारण्यात आलेले पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार आहे. शहर अभियंता विभागामार्फत या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, पालिका आयुक्तांच्या मान्यतेनुसार रुग्णालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ११ डिसेंबरला दिलेल्या मान्यतेनुसार पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी करार पद्धतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून रुग्णालय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, १५ डिसेंबरला राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली होती. आता महापालिकांच्या क्षेत्रापुरती लागू असलेली आचारसंहिता संपुष्टात आली आहे. त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेनुसार १९ जानेवारीला करार पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

या पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी सुरक्षा व्यवस्था, तसेच स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. पालिकेच्या २०१८ मधील परिपत्रकानुसार सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसाठी आयुक्तांची मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार २१ जानेवारीला आवश्यक त्या सुरक्षा रक्षक व सफाई कामगार उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास २७ जानेवारीला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या मान्यतेनंतर सफाई कामगारांसाठी उपआयुक्त (मालमत्ता विभाग), तसेच सुरक्षा रक्षकांसाठी उपआयुक्त (आपत्ती व्यवस्थापन विभाग) यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

उर्वरित आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्णत्वास जात असून, आयुक्तांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या रुग्णालयामुळे नेरूळ, जुईनगरसह परिसरातील पाळीव, तसेच भटक्या प्राण्यांना दर्जेदार पशुवैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध होणार असून, प्राणी आरोग्यसेवेला मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com