आदिवासी मुलांच्या ओठांवर जर्मन शब्द

आदिवासी मुलांच्या ओठांवर जर्मन शब्द

Published on

खेड्यातील शाळेच्या वर्गखोलीतून जगाशी संवाद
आदिवासी मुलांच्या ओठांवर ‘जर्मन’ शब्द; मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांचा अभिनव उपक्रम
मोहिनी जाधव; सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १० : नेहमीच सुविधांच्या अभावामुळे चर्चेत राहणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील इंदगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तर थेट सातासमुद्रापारची भाषा आत्मसात करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. येथील दुर्गम भागातील आदिवासी मुले आता मराठी आणि इंग्रजीसोबतच चक्क ‘जर्मन’ भाषेत संवाद साधू लागली आहेत.

जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपली ग्रामीण मुले मागे पडू नयेत, या जिद्दीतून मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांनी ‘लेट्स कनेक्ट द वर्ल्ड थ्रू द जर्मन लँग्वेज’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. केवळ २५ पटसंख्या असलेल्या या शाळेत कॉन्व्हेंटसारख्या भव्य इमारती नाहीत, पण शिक्षणाचा दर्जा मात्र आंतरराष्ट्रीय स्तराचा आहे. प्राथमिक शब्द आणि छोट्या संवादांपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आज ही मुले एकमेकांशी आणि घरी पालकांशीही आत्मविश्वासाने जर्मन भाषेत बोलत आहेत.

एआयचा वापर
ठाणे जिल्हा परिषदेच्या ‘दिशा’ उपक्रमांतर्गत या प्रयोगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शिक्षण अधिक रंजक बनवण्यात आले आहे.

आदिवासी मुलांसाठी संधींची कवाडे खुली
शाळेत जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी ‘कातकरी’ या आदिवासी समाजातील आहेत. महाराष्ट्र शासन आणि जर्मनी यांच्यातील शैक्षणिक कराराचा फायदा या ग्रामीण मुलांना मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. जर्मन भाषा शिकल्यामुळे भविष्यात या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

पालकांमध्ये अभिमानाचे वातावरण
दुर्गम भागात राहणाऱ्या पालकांसाठी आपली मुले परदेशी भाषा बोलतात, ही बाब कुतूहलाची आणि प्रचंड अभिमानाची ठरली आहे. खासगी महागड्या शाळांमध्ये जे शिक्षण मिळते, तेच शिक्षण आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मिळत असल्याने पालकांचा शाळेवरचा विश्वास अधिक वाढला आहे.

‘‘माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केवळ तालुक्यातीलच नव्हे, तर जगातील मुलांशी स्पर्धा करावी, अशी माझी इच्छा आहे. जेव्हा मुलांची नवीन काही शिकण्याची ओढ दिसते, तेव्हा आम्ही वेळेचे नियोजन करून जर्मन भाषेचे वर्ग घेतो. आदिवासी भागातील मुले आज ज्या आत्मविश्वासाने ही भाषा बोलतात, ते पाहून मनस्वी समाधान मिळते.’’
- अमोल पेन्सलवार (मुख्याध्यापक, जि. प. शाळा इंदगाव)

ठळक वैशिष्ट्ये :
उपक्रम : ‘लेट्स कनेक्ट द वर्ल्ड थ्रू द जर्मन लँग्वेज’
शाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदगाव (ता. अंबरनाथ)
प्रोत्साहन : तत्कालीन सीईओ रोहन घुगे यांच्या ‘दिशा’ उपक्रमातून प्रेरणा.
उद्दिष्ट : जागतिक संवाद कौशल्य आणि सांस्कृतिक आदानप्रदान विकसित करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com