विज्ञान महती आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
मुरूडमध्ये दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात
मुरुड, ता. १० (बातमीदार) ः अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय आणि द. ग. तटकरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत देशविदेशातील ३५० संशोधकांनी सहभाग नोंदवला. रासायनिक विज्ञान, भौतिक विज्ञान, जीवन विज्ञान आणि संगणक तंत्रज्ञानातील अत्याधुनिक बदलांवर चर्चा करण्यात आली.
या परिषदेचे उद्घाटन अंजुमन महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात उत्साहात पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आणि पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. शिवराम गर्जे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. दीनानाथ पाटील, अंजुमन इस्लाम जंजिराचे जनरल सेक्रेटरी हिफझूररेहमान नझीर, सहसचिव अब्दुलरहीम कबले, खजिनदार अल्ताफ हुसेन मलिक, महाविद्यालयाचे अध्यक्ष जैनुद्दीन कादिरी, महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य इमरान मलिक व इस्माईल शेख, वीर वाजेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, अंजुमन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
परिषदेदरम्यान देशविदेशातील तज्ज्ञांनी विविध समकालीन व शाश्वत विकासाशी निगडित विषयांवर व्याख्याने दिली. डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी शाश्वत भविष्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. शिवराम गर्जे यांनी शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण साहित्य या विषयावर आपले विचार मांडले. तर आसाम विद्यापीठातील डॉ. पार्था पालीत यांनी विविध कृत्रिम औषधांची परिणामकारकता आणि त्यांची शाश्वतता या विषयावर व्याख्यान दिले. इजिप्त येथील टाटा विद्यापीठाचे डॉ. बासेम केष्टा यांनी शाश्वततेसाठी महत्त्वपूर्ण नॅनो साहित्य या विषयावर संशोधनात्मक मांडणी केली. अक्षा मेमोन यांनी देशाच्या शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाचे उन्नतीकरण या विषयावर व्याख्यान दिले. दक्षिण कोरियातील येथील डॉ. शकीलूर रहमान यांनी हरित हायड्रोजन व शाश्वत ऊर्जा भविष्यासाठी फोटो-कॅटालिटिक वॉटर स्प्लिटिंग या विषयावर सादरीकरण केले. याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे माजी संयुक्त सचिव डॉ. दीनानाथ पाटील यांनी क्वांटम सुपरपोजिशन व इंटरफेरन्स फिनॉमिना या विषयावर शास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल मार्गदर्शन केले.
या परिषदेच्या यशस्वितेसाठी सह-समन्वयक प्रा. तमसील शहजहान, डॉ. अनिल पालवे व प्रा. मेहरीन डावरे, आयोजक सचिव डॉ. गुरमीत वाधवा आणि प्रा. अल्ताफ फकीर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

