जलवाहिनीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल
पुणे लिंक रोडवर पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
जलवाहिनीच्या कामासाठी फुटपाथ उखडले; अपघाताची भीती
कल्याण, ता. १० (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील प्रभाग ५ ‘ड’ अंतर्गत येणाऱ्या पुणे लिंक रोडवर जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे परिसरातील फुटपाथ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खोदकामामुळे पादचाऱ्यांसाठीचा मार्ग उरलेला नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महिलांना या खोदलेल्या फुटपाथमुळे मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता आधीच अरुंद आणि वाहनांची वर्दळ जास्त असल्याने पादचाऱ्यांना थेट वाहनांच्या समोरून चालावे लागत आहे. यामुळे या परिसरात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कंत्राटदाराकडून काम करताना आवश्यक असलेले सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. खोदलेल्या ठिकाणी बॅरिकेडिंग किंवा धोक्याच्या सूचना देणारे फलक अपुरे आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेसा प्रकाश नसल्याने पादचाऱ्यांचा पाय घसरून खड्ड्यात पडण्याच्या घटना घडू शकतात. अनेक दिवस उलटूनही फुटपाथची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नागरिकांची मागणी
फुटपाथ उखडल्याने आम्हाला मुख्य रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे सतत भीती वाटते. प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून फुटपाथ पुन्हा सुस्थितीत करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. प्रशासनाने विकासकामे जरूर करावीत, पण ती करताना पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळू नये. कंत्राटदारावर वचक ठेवून हे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे, अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

