कल्याण पूर्वेला कचऱ्याचा विळखा
कल्याण पूर्वेला कचऱ्याचा विळखा
जुनी जनता बँक परिसरात दुर्गंधी; ''स्वच्छ भारत'' मोहिमेचा फज्जा
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : कल्याण पूर्व येथील जुनी जनता बँक परिसरात गेल्या चार दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, "स्वच्छ भारत अभियानाचा प्रशासनाला विसर पडला आहे का," असा संतप्त सवाल रहिवासी उपस्थित करत आहेत.
शहरात एकीकडे स्वच्छतेचे मोठमोठे दावे केले जात असताना, प्रत्यक्षात मात्र कचरा संकलनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. जुनी जनता बँक परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे, त्यातच या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि शालेय विद्यार्थ्यांना नाकाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत आहे. आम्ही नियमित मालमत्ता कर भरतो, मग आम्हाला साधी स्वच्छताही का मिळत नाही," असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
पालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा या परिसरात पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. घंटागाड्या वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीही नागरिक करत आहेत. जर येत्या २४ तासांत या ठिकाणचा कचरा उचलून परिसर निर्जंतुक केला नाही, तर स्थानिक रहिवासी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
साचलेला कचरा तत्काळ उचलून त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, कचरा संकलनासाठी घंटागाडीची फेरी नियमित आणि वेळेवर असावी, या परिसरातील कचरा कुंडी हटवून ‘झीरो वेस्ट’ मॉडेल राबवावे. अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

