नमिता सुधाकर घारे यांना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य;
नमिता घारे यांना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य
सभापतिपदासाठी प्रबळ दावेदारी
कर्जत, ता. १० (बातमीदार) ः रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, जिल्हाभरात वेगवेगळे राजकीय चित्र आहे. कर्जत तालुक्यातील बीड बुद्रुक पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता घारे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. तब्बल ४,५१७ मताधिक्याने घारे विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे नमिता घारे यांची दावेदारी आता थेट पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी प्रबळ मानली जात आहे.
नमिता घारे यांचे पती सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष असून, ते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. शिक्षण व क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. कर्जत-खालापूर तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनी घरच्या वार्डात फारसे लक्ष दिले नाही; तरीही या गणात राष्ट्रवादीला निर्विवाद आघाडी मिळाल्याचे बोलले जात आहे. बीड बुद्रुक गणामध्ये खांडपे, बीड, कोंदीवडे, शिरशे आणि पळसदरी या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये घारे कुटुंबाचे सामाजिक व राजकीय संबंध असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मोठा फायदा झाल्याचे स्थानिक स्तरावर सांगितले जात आहे.
नमिता घारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय नेत्या आहेत. यापूर्वी त्यांनी खांडपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. सध्या त्या गीता इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका असून, शैक्षणिक क्षेत्रातील कामामुळे त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरवर्षी सोमजाई माता मंदिरात होणाऱ्या हजारो महिलांच्या उपस्थितीतील हळदी-कुंकू समारंभातूनही त्यांचा महिलांशी घनिष्ठ संपर्क राहिला आहे.
पंचायत समिती सभापतिपदी वर्णी
कर्जत पंचायत समितीमध्ये एकूण १२ पैकी १० जागांवर परिवर्तन विकास आघाडीने विजय मिळवला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा तर ठाकरे गटाच्या चार जागांचा समावेश आहे. या राजकीय गणितामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीकडून नमिता घारे या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. सुधाकर घारे यांच्या अनुभवाचा आणि नमिता घारे यांच्या कार्यशैलीचा फायदा पंचायत समितीच्या माध्यमातून कर्जत तालुक्याच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, लवकरच त्यांची सभापतिपदी निवड होण्याची दाट शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
निकालाची स्थिती
एकूण मतदान : ११,५९७
नमिता घारे (विजयी) : ७,९५४ मते
विरोधी उमेदवार : ३,४५७ मते
मताधिक्य : ४,५१७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

