

वालधुनीची शोकांतिका
औद्योगिक कचऱ्याने गुदमरतेय नदी
वालधुनीचा श्वास घुटमळतोय; पुनरुज्जीवन कागदावरच
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ११ : उल्हासनगर शहरातून वाहणारी आणि अंबरनाथच्या डोंगररांगांतून उगम पावलेली वालधुनी नदी आज अक्षरशः काळ्या मृतप्रवाहात रूपांतरित होताना दिसत आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळून वाहताना तिच्या पाण्याचा रंग दर आठवड्याला बदलतो. कधी लालसर, कधी गडद काळा! हजारो किलो औद्योगिक कचरा, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि नाल्यांचे पाणी रोज तिच्या प्रवाहात मिसळत असल्याने वालधुनीचा श्वासच अडकल्यासारखा झाला आहे. पुनरुज्जीवनाच्या घोषणा वर्षानुवर्षे होत आहेत. पाहण्या होतात; मात्र प्रत्यक्षात नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.
अंबरनाथ शहरातून पुढे उल्हासनगरमध्ये प्रवेश करताना वालधुनीचे नैसर्गिक रूप पाहण्याची अपेक्षा असते; मात्र प्रत्यक्षात ती नाल्यांच्या साखळीत अडकलेली दिसते. शिलाहारकालीन शिवमंदिराच्या परिसरातून वाहताना नदीचे अस्तित्वच शोधावे लागते. मंदिराजवळून पुढे अनेक लहान-मोठे नाले नदीत मिसळू लागतात आणि तेथून सुरू होतो प्रदूषणाचा अखंड प्रवास. नदीच्या काठावर असलेल्या कारखान्यांतून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. अनेक कारखान्यांतून उरलेला कच्चा माल व घनकचरा नदीच्या किनारी टाकला जातो. हा कचरा काही दिवसांतच पावसाच्या पाण्याने किंवा नैसर्गिक प्रवाहाने नदीच्या पात्रात मिसळतो. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक, रासायनिक अवशेष आणि इतर घनकचरा नदीत मिसळतो. ज्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाहही बाधित होत आहे.
पाण्याला काळा रंग
उल्हासनगर स्थानकाजवळ नदीचे विस्तीर्ण पात्र स्पष्टपणे दिसते; मात्र त्या पाण्याचा रंग काळवंडलेला आहे. काही दिवसांपूर्वी लालसर दिसणारे पाणी आता गडद काळे झाले आहे. या रंगबदलामुळे रासायनिक सांडपाणी मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पर्यावरणप्रेमींनी पाण्याचे नमुने तपासून प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेल्या कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामामुळेही नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर माती, बांधकाम साहित्य आणि कचरा साचलेला दिसतो. पावसाळ्यात हा सर्व कचरा थेट नदीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कचरा नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे; मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
नागरिक अस्वस्थ
वालधुनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी यापूर्वी अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या. प्रकल्पांची चर्चा झाली, निधीच्या हालचालींचे आश्वासन देण्यात आले; मात्र प्रत्यक्षात नदीची अवस्था ‘जैसे थे’च आहे. काही दिवसांपूर्वी अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे यांनी शिवमंदिर परिसरात पाहणी केली होती; तरीही त्यानंतर ठोस बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे प्रशासन, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था जाग्या होणार का, हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाला अस्वस्थ करत आहे.
वालधुनी नदीत आजही औद्योगिक कचरा आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे. ही परिस्थिती केवळ पर्यावरणाची नाही, तर दोन्ही शहरांच्या भवितव्याची गंभीर चिंता आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नदीसाठी स्वतंत्र, वेळबद्ध आणि पारदर्शक असा पुनरुज्जीवन आराखडा तातडीने तयार करावा. नदीकाठी संवर्धन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक उत्सर्जनावर कठोर नियंत्रण आणि नागरिकांच्या सहभागातूनच वालधुनीला पुन्हा जिवंत करता येईल.
- शशिकांत दायमा, अध्यक्ष, वालधुनी जल बिरादरी, पर्यावरणप्रेमी
............................................
आणि पुन्हा प्रशासनाला विस्मरण?
५ जून २०२५ रोजी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त दैनिक ‘सकाळ’ने “वालधुनीला मरणयातना…” या मथळ्याखाली एक विशेष पान प्रसिद्ध केले होते. यामुळे उल्हासनगर आणि अंबरनाथमधील प्रदूषणाची भीषण वास्तव राज्यासमोर आले आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
विधानसभेत पडसाद
लेख प्रसिद्ध होताच खासदार, आमदार आणि महापालिका प्रशासनाच्या तातडीने बैठकांचे सत्र सुरू झाले. वालधुनी नदीसाठी एक ‘संयुक्त आणि नियोजनबद्ध कृती आराखडा’ तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. औद्योगिक सांडपाण्यावर नियंत्रण मिळवणे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे आणि नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले गेले. हा प्रश्न इतका गाजला की थेट विधानसभेतही यावर चर्चा झाली आणि नदीला ‘जीवनदान’ देण्याचा निर्धार लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
आजची वास्तव स्थिती
दुर्दैवाने, वर्षभरानंतर मागे वळून पाहताना त्या बैठका, घोषणा आणि आश्वासने केवळ ‘कागदोपत्रीच’ राहिल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. नदीत रासायनिक सांडपाणी मिसळण्याचे सत्र आजही विनासायास सुरूच आहे. घोषणा करूनही औद्योगिक विसर्गावर कोणतीही ठोस किंवा दृश्यमान कारवाई झालेली दिसत नाही. पुनरुज्जीवन आराखड्याचा कोणताही सकारात्मक परिणाम नदीच्या पात्रात किंवा पाण्याच्या गुणवत्तेत उमटलेला नाही.
अनुत्तरित प्रश्न: पर्यावरणदिनी व्यक्त झालेला तो निर्धार केवळ प्रतीकात्मक होता का? संयुक्त कृती आराखडा नेमका कोणत्या फाइलमध्ये अडकून पडला आहे? विधानसभेत चर्चा होऊनही जमिनीवर परिस्थिती का बदलली नाही?
एकेकाळी या दोन्ही शहरांची ओळख असलेली वालधुनी नदी आज त्याच काळवंडलेल्या प्रवाहातून प्रशासनाला या प्रश्नांची उत्तरे विचारत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.