अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नको

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नको

Published on

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन नको
परीक्षांवर परिणाम होण्याची भीती; आमदार म्हात्रे यांचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

टोकावडे, ता. ११ (बातमीदार) : एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांची लगबग सुरू असतानाच दुसरीकडे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या संचालकांनी ४ फेब्रुवारीला आदेश काढला आहे. शिक्षण विभागाच्या या गोंधळामुळे परीक्षांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे या कालावधीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करू नये, अशी मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.
राज्यात बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, तर २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे या परीक्षा संपत नाहीत, तोपर्यंत शिक्षकांचे समायोजन करू नये. त्यावर स्थगिती आणावी, अशी मागणी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.
विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे, परीक्षेचे कामकाज पाहणे, मंडळाच्या पेपरची तपासणी करणे इत्यादी कामे शिक्षकांना करावी लागणार आहेत. शिक्षकांचे समायोजन तत्काळ केल्यास परीक्षेच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन, फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते, असेही म्हात्रे म्हणाले.
राज्यातील दुर्गम डोंगराळ भागातील विद्यार्थीसंख्येत संचमान्यतेसंबंधित निकष शिथिल करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली होती. त्यात विद्यार्थ्यांच्या संख्येचा निकष शिथिल करण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यावर योग्य निर्णय झाल्याशिवाय समायोजन करू नये, असेही म्हात्रे म्हणाले.

‘आदेश स्थगित करावा’
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक यांनी २०२५/२६ या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात आदेश फेब्रुवारी २०२६ ला काढला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने शिक्षकांचे समायोजन केले, तर भविष्यात फार मोठ्या अडचणी निर्माण होतील, अशा प्रकारची भीतीदेखील व्यक्त केली आहे. त्यामुळे काढलेला आदेश स्थगित करावा, अशी विनंती आमदार म्हात्रे यांनी केली आहे.

फोटो - 611

Marathi News Esakal
www.esakal.com