व्यापाऱ्यांसह ग्राहकही हापूस आंब्याच्या प्रतीक्षेत

व्यापाऱ्यांसह ग्राहकही हापूस आंब्याच्या प्रतीक्षेत

Published on

जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच हापूस आंब्याच्या आवकेत घट झाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या बाजारात दररोज अवघ्या १५ ते २० पेट्या आंब्यांची आवक होत असून, अपेक्षित प्रमाणात माल येत नसल्याने व्यापारी आणि ग्राहक दोघेही प्रतीक्षेत आहेत. बाजारातील व्यापाऱ्यांच्या मते, १० मार्चपासून आवक हळूहळू वाढण्याची शक्यता आहे; मात्र खऱ्या अर्थाने हापूस आंब्याचा हंगाम १५ एप्रिलनंतरच सुरू होईल.

यंदा हवामानातील बदलांचा थेट परिणाम आंबा पिकावर झाला आहे. विशेषतः फुलोऱ्याच्या काळात झालेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढउतार यामुळे मोहोर गळून पडला. परिणामी उत्पादन घटले असून, बाजारात सुरुवातीच्या टप्प्यात माल कमी प्रमाणात येत आहे. सामान्यतः हंगामाच्या पहिल्या आवकाला ‘मुहूर्ताचा माल’ म्हणून जास्त भाव मिळतात; मात्र यंदा आवकच कमी असल्याने तसे भाव मिळू शकले नाहीत.

याचबरोबर केरळ, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील आंब्यांची आवक आधीच सुरू झाली आहे. या राज्यांतील आंबे तुलनेने कमी दरात उपलब्ध असल्याने बाजारात स्पर्धा वाढली आहे. परिणामी कोकणातील हापूस आंब्याला अपेक्षित भाव मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

व्यापारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, जर हवामान अनुकूल राहिले आणि पुढील महिन्यात आवक वाढली, तर भाव स्थिर होण्याची शक्यता आहे. अन्यथा कमी उत्पादन आणि बाहेरील राज्यांतील मालामुळे हापूसच्या दरावर दबाव कायम राहू शकतो. ग्राहक मात्र भाव कमी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर उत्पादकांना योग्य भाव मिळावा, यासाठी बाजारातील स्थिती सुधारण्याची आशा आहे.

तज्ज्ञांच्या मते, हवामानातील अनिश्चितता पुढील काही वर्षांतही आंबा उत्पादनासाठी मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना, हवामानानुसार बदलणाऱ्या शेती पद्धती आणि संरक्षणात्मक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागानेही सूचित केले आहे.

यंदा हवामानातील बदलांचा थेट परिणाम आंबा पिकावर झाला आहे. विशेषतः फुलोऱ्याच्या काळात झालेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढउतार यामुळे मोहोर गळून पडला. परिणामी उत्पादन घटले असून, बाजारात सुरुवातीच्या टप्प्यात माल कमी प्रमाणात येत आहे. सामान्यतः हंगामाच्या पहिल्या आवकाला ‘मुहूर्ताचा माल’ म्हणून जास्त भाव मिळतात; मात्र यंदा आवकच कमी असल्याने तसे भाव मिळू शकले नाहीत.
- संजय पानसरे, संचालक, फळ बाजार

Marathi News Esakal
www.esakal.com